मनमाड (नाशिक) : शहराच्या सिकंदर भागातील बालिकेच्या अपहरण प्रयत्नाची घटना ताजी असतानाच, गुरुवारी (दि. १७) उपजिल्हा रुग्णालयात आणखी एक अपहरणनाट्य घडले.
लसीकरणासाठी रुग्णालयात आलेल्या महिलेच्या तीनवर्षीय चिमुकलीला पळविण्याचा प्रयत्न तरुणाने केला. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव फसला. नागरिकांनी संशयिताला चोप देत नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषदेतील सफाई कर्मचारी प्रवीण निकाळे यांची पत्नी छाया या नऊ महिन्यांच्या मुलाला नियमित लस देण्यासाठी उपजिल्हा रुगणालयात गेल्या होत्या. सोबत त्यांची आई आणि तीन वर्षांची मुलगीदेखील होती. खेळता खेळता चिमुकली रुग्णालयाबाहेर आली, तेव्हा एका तरुणाने तिला उचलून नेले. त्यामुळे रडायला लागलेल्या मुलीला पाहून आजूबाजूच्या लोकांना संशय आला. त्यांनी त्या तरुणाची विचारपूस केली. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेवढ्यात मुलीच्या शोधातील आई तेथे आली. छाया यांनी हाक मारताच मुलीने आईकडे धाव घेतली. एव्हाना त्या तरुणाची भंबेरी उडाली. हा अपहरणाचा प्रकार असल्याच्या संशयावरून संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याने जय पुरुषोत्तम वैराळे (रा. शिवर, जि. अकोला) असा परिचय दिला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, सखोल चौकशी केली जात असल्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.
सिकंदरनगर परिसरात अलीकडे पाचवर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुली सुखरूप वाचल्या. गुरुवारी झालेल्या प्रकारात जमावाने जाब विचारला असता, संशयिताने 'लहान मुलगी आणून दिल्यास १० लाख रुपये देऊ' असे एकाने सांगितल्याचा दावा केला. हे प्रकरण अपहरणाच्या मोठ्या साखळीशी जोडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकांनी अधिक सावध राहण्याचे आणि पोलिसांनी या प्रकरणाचा मूळ छडा लावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.