न्यायालयीन कोठडी Pudhari File Photo
क्राईम डायरी

Kathe Galli Stone Pelting Update | दगडफेकीतील 39 जणांना न्यायालयीन कोठडी

सुक्का गँगच्या मास्टरमाइंडचा शोध सुरू : न्यायालय आवारात नातेवाइकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : काठे गल्लीतील सातपीर बाबा दर्गा हटविताना पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या ३९ संशयितांना शनिवारी (दि. १९) न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मोठ्या पोलिस बंदोबस्तात सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले गेले. यावेळी नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, ही दंगलसदृश स्थिती निर्माण करणाऱ्या सुक्का गँगच्या मास्टरमाइंडचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

काठे गल्ली येथील सातपीर बाबा दर्गा हटविण्याच्या कारवाईदरम्यान काही संशयितांनी सोशल मीडियावर चिथावणीखोर आणि पोलिसांविषयी द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्याने, पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत तब्बल २१ पोलिस अधिकारी व अंमलदार गंभीर जखमी झाले होते. अश्रूधुराच्या सात नळकांड्या फाेडून जमाव नियंत्रित केल्याने पुढील अनर्थ टळला हाेता. या घटनेनंतर पाेलिसांनी धाडसत्र राबवून ३९ जणांना अटक केली हाेती. त्यांच्याकडे चाैकशी पूर्ण झाली असून, आता त्यांची रवानगी नाशिक राेड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे, तर तपास पथकाने पारंपरिक तपासासह तांत्रिक तपासावर विशेष भर दिला आहे. तर घटनास्थळी किती संशयितांचे माेबाइल ॲक्टिव्ह हाेते. त्यांच्या व्हाॅट्सॲमधून चिथावणीचे मेसेज फाॅरवर्ड करण्यात आले का? संशयित कुठून आले हाेते? दगड माेठ्या प्रमाणात कसे उपलब्ध झाले, या सूक्ष्म बाबींचा तपास सुरू झाला आहे.

77 पैकी काही दुचाकी परत

टवाळखाेरांसह जमावाची माथी भडकाविणाऱ्या मास्टरमाइंड संशयितांचे शहरात विविध अवैध व्यवसाय असून, एकाच गटात माेडणाऱ्या दुसऱ्या गटाने अनधिकृत धार्मिकस्थळ निष्कासित करण्याच्या कारवाईस आक्षेप घेत पाेलिसांवर तुफान दगडफेक केली हाेती. त्यातच, आता ७७ संशयित दुचाकींपैकी काही दुचाकी सखाेल चाैकशी व पडताळणीअंती मूळ मालकांना परत करण्यात आल्या आहेत.

मोबाइलचा डम्प डाटा मिळवणार

सुक्का गँगच्या सूत्रधारांनी समाजकंटकांना चिथावणी दिल्याने हा गंभीर प्रकार घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता चिथावणी देणाऱ्यांचा शाेध सुरू झाला आहे. इतर तांत्रिक विश्लेषणातून उघड हाेणाऱ्या माहितीनुसार अटकसत्र सुरूच राहील, असे पाेलिसांनी सांगितले आहे, तर घटनेच्या दिवशी उस्मानिया चाैक येथे रात्री १२ ते २.३० पर्यंत किती माेबाइल कसे अॅक्टिव्ह हाेते, त्यानुसार डम्प डाटा मिळविला जात आहे.

दगडफेक करणारे सीसीटीव्हीत

एकाच गटातील बेराेजगार मुले, टवाळखाेर व नशा करणारे संशयित दगडफेक करताना काही सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पाेलिसांवर हल्ला करण्यापूर्वी जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे दगडफेक करणारे काही वेळात फरार झाले होते. मात्र, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT