कर्नाटकी हनीट्रॅप..! राजकारणातले पाप pudhari photo
क्राईम डायरी

कर्नाटकी हनीट्रॅप..! राजकारणातले पाप

Honeytrap Case : कर्नाटकी हनीट्रॅप..! राजकारणातले पाप

पुढारी वृत्तसेवा
गोपाळ गावडा, बेळगाव

प्रेमात आणि युद्धात सारे काही क्षम्य असते. आता राजकारणातही सगळेच क्षम्य मानले जातेय. अगदी खून, बलात्कारासारखे अमानवी गुन्हे करणारे नेतेही उजळ माथ्याने निवडणुका लढवतात अन् जिंकतातही! राजकारणाचा स्तर तर घसरलाच आहे, पण एकूणच सामाजिक मूल्यांचाही स्तर घसरल्याचे अनुभवावे लागते आहे. अशा स्थितीत राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नेते कुठल्या कुठल्या स्तराला जातील, याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. कर्नाटकात तब्बल 48 नेत्यांना हनीट्रॅप केले जाणे, म्हणजे मधुर जाळ्यात अडकवले जाणे, हे त्याचेच उदाहरण. अन् लक्षात घ्या या मधुजालात अडकलेले नेते कोणी लेचेपेचे दुसर्‍या फळीतले कार्यकर्ते नाहीत, तर चक्क मंत्री आणि केंद्रीय मंत्रीही आहेत...

तब्बल साडेतीनशे महिलांचे लैंगिक शोषण करून त्याचे चित्रण करणारा आणि त्याआधारे संबंधितांना ब्लॅकमेल करणारा प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान देवेगौडांचा खासदार राहिलेला नातू सध्या तुरुंगात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात या प्रज्वलकांडाने कर्नाटकासह देशभरात खळबळ माजवली होती. ते प्रकरण चौकशीआधीन असताना आता पुन्हा कर्नाटक चर्चेत आलेय ते हनीट्रॅप अर्थात मधुजालामुळे. काही मंत्र्यांसह तब्बल 48 नेत्यांना मदनिकांच्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्याच एका नेत्याने विधानसभेत ही तक्रार मांडल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मात्र गंमत म्हणजे हे हनीट्रॅपिंग फक्त काँग्रेसपुरते मर्यादित नाही, तर भाजप नेतेही त्यात अडकलेले आहेत.

सत्तेसाठी काय पण..!

सत्ता माणसाला काय काय करण्यास भाग पाडते! इतिहासात शक्तीशाली राजांना नामोहरम करण्यासाठी किंवा थेट काटा काढण्यासाठी विषकन्यांचा वापर केला जायचा. मदनिकांना विषकन्या बनवून अशा राजाची राणी किंवा दासी बनवून राजवाड्यात सोडले जायचे आणि पुढचे कार्य विषकन्या साध्य करायची. अशा प्रकारचे अलिकडचे उदाहरण म्हणजे माताहरी. पहिल्या महायुद्धाच्या काळाता माता हरी या नेदरलँडच्या मदनिकेने फ्रान्ससाठी हेरगिरी केली, असे मानले जाते. मंचावरची नर्तिका असलेल्या माताहरीने अनेक नेत्यांशी सलगी करून त्यांची गुपिते बाहेर काढली अन् ती फ्रान्सला पुरवली होती. त्याच आरोपाखाली तिला फ्रान्समध्ये 1971 साली मृत्यूदंड दिला गेला, हा पुढचा भाग. मात्र शत्रूला नामोहरम करण्यासाठी मदिरा आणि मदनिकांचा वापर नवा नाही. पण आता नव्याने येऊ घातलाय.

’मदिरा आणि मदनिका’ हे माझे कच्चे दुवे आहेत, असे कर्नाटकाच्या एका माजी मुख्यमंत्र्याने नव्वदीच्या दशकात म्हटले होते. म्हणजे तेव्हाही नेत्यांना सौंदर्याचा, पैशांचा हव्यास होताच. सध्याचे कर्नाटकातले प्रकरण सत्तेच्या हव्यासातून घडलेय. डी. के. शिवकुमार आणि बी. वाय. विजयेंद्र हे कर्नाटकातील महत्त्वाकांक्षी राजकारणी. दोघेही साधारण मध्यमवयीन; विजयेंद्र त्यापैकी अधिक तरुण. शिवकुमार हे काँग्रेसचे मातब्बर नेते, तर विजयेंद्र हे भाजपचे दिग्गज नेते येडियुराप्पा यांचे पुत्र. शिवकुमारांना हवे आहे मुख्यमंत्रीपद, तर विजयेंद्र यांना टिकवायचे आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्षपद. पण दोघांनाही अंतर्गत विरोधने ग्रासले आहे. तो विरोध मोडून काढण्यासाठी त्यांनीच नेत्यांना मधुजालात अडकवलेय, असा जाहीर आरोप भाजपचे नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केला आहे. तो खरा आहे, असे दाखवणारे सध्या तरी काहीच पुरावे नाहीत. पण मधुजालात अडकलेल्या या 48 नेत्यांमध्ये मंत्री आहेत, आमदार आहेत, केंद्रिय मंत्री आहेत आणि एका केंद्रिय मंत्र्याचा मुलगाही आहे!

दुसर्‍या पक्षातील विरोधकांना हरवणे तसे सोपे असते. एकतर दर पाच किंवा त्यापेक्षाही कमी वर्षांनी मतदानातून ती संधी येते. अवघड असते ते स्वपक्षातील विरोधकांना हरवणे. मग त्यासाठी असे हातखंडे वापरले जातात. 2019 साली काँग्रेस सरकार उलथवून 17 आमदारांसह भाजपमध्ये दाखल झालेल्या रमेश जारकीहोळींच्या जोरावर भाजप सरकार सत्तेवर आले. त्याच रमेश जारकीहोळी यांची एका महिलेसोबतची अश्लील सीडी 2021 मध्ये व्हायरल झाली होती. ती बनवण्यामागे खुद्द भाजपमधलेच लोक होते, हे ओपन सिक्रेट आहे. तशाच सीडी आणि पेन ड्राईव्ह आता बनवण्यात आल्या आहेत. त्यात काही नेते काही महिलांशी सलगी करताना, काही जणांशी जागांच्या व्यवहाराबाबत बोलताना कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

कपडे के अंदर सब नंगे!

प्रत्येकजण कपड्यांच्या आत नग्न असतो, अशा आशयाची इंग्रजी म्हण आहे. नेते जरा जास्तच नग्न असतात का, किंवा लवकर नग्न होतात का? 48 नेते हा आकडा प्रचंड मोठा आहे. समाजकारण आणि राजकारणात एकादा नेताही अशा अवस्थेत सापडणे क्षम्य नसताना इतक्या नेत्यांनी हनीट्रॅप होणे, हे आकलनापलिकडचे आहे. त्यात केंद्र सरकारमधला एका महत्त्वाचा नेताही असणे, केंद्रातील एका महत्त्वाच्या नेत्याचा मुलगाही असणे हे अजून आश्चर्यकारक आणि चिंतनीयही.

कट कसा उघडकीस आला?

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याजवळील काही मंत्र्यांना लक्ष्य करण्याचा कट रचणार्‍या टोळीने प्रथम बंगळूरमधील एका प्रभावशाली मंत्र्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. यलहंकाजवळील त्यांच्या घरी ही टोळी वारंवार भेट देत होती. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर मिळवला व वारंवार या मोबाईलवर कॉल केले. त्यामुळे मंत्र्यांना त्या टोळीवर संशय आला व त्यांनी त्यांना पकडले. त्यांची चौकशी केली असता टोळीतील सदस्य सहजपणे काहीही बोलण्यात तयार नव्हते. त्यामुळे त्यांना एका खोलीत डांबण्यात आले. त्यांना पैशाचे आमीष दाखविल्यानंतर संपूर्ण नेटवर्कची माहिती उघड झाली. या जाळ्यात आणखी कोण अडकले आहे, याबद्दल त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या मंत्र्यांनी सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांच्याशी संपर्क साधला आणि तुम्हालाही या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. असा इशारा मिळाल्याने मंत्री राजण्णा सतर्क आहेत.

पहिल्यांदाच जयमहल येथील सहकार मंत्री राजण्णा यांच्या सरकारी निवासस्थानी हनीट्रॅप करणारी टोळी गेली. यावेळी राजण्णा यांनी ती बाब गांभीर्याने घेतले नाही. पण जेव्हा ती टोळी दुसर्‍यादा गेली तेव्हा त्यांना संशय आला. राजण्णा यांनी त्यांच्याकडील कॅमेरा आणि इतर उपकरणे काढून घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर सदर टोळीने या कृत्यामागे कोण आहे, हे स्पष्ट केले.देशाचे राजकारण सध्या रसातळाला गेल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात आका आणि अण्णांच्या संघर्षात गुन्हेगारी वाढली आहे, गँग मोकाट फिरताहेत; तर कर्नाटकात खुलेआम खून होत नसले तरी चारित्र्यहनन सुरू आहे.

हनीट्रॅपचा पुढचा भाग काय असेल?

भाजपमधल्या परिवारवादाला विरोध करणे ही एक बाब, पण तो विरोध कमरेचे सोडून करणे म्हणजे भलतेच. ते कर्नाटकात घडत आहे. हनीट्रॅप ही त्याची पुढची पायरी, खरेतर खालची पायरी. माणूस आहे, तर त्याला पंचेंद्रियांची तहान-भूक भागवावी लागणार. पण ती तहान-भूक कोणी तरी मुद्दाम निर्माण करत असेल तर मात्र माणसाने जागे झाले पाहिजे, सार्वजनिक जीवनात वावरणार्या नेत्यांनी तर आधीपासूनच जागरुक राहिले पाहिजे. कृष्ण गीतेत म्हणतो, अन्याय करणारा पापीच असतो. पण तो अन्याय निमूटपणे सहन करणारा त्याहून जास्त पापी. तसे मद-मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयोग सत्ताधीशांवर होणारच; कसोटी आहे ती त्या मधुजालात न अडकण्याची. ते नेत्यांना शक्य होईल असे दिसत नाही. त्यामुळे हनीट्रॅप-1 गाजतोय, त्याचा सिक्वेल (पुढचा भाग) बनण्याच्या मार्गावरही असेल, कोण जाणे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT