पोलिसांनी तपास सुरु केला. मृतदेहाचा पंचनामा केला तेव्हा मुलीच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या कसल्याही खुणा नव्हत्या. केवळ गळा दाबल्याचे व्रण स्पष्टपणे दिसत होते. जवळपास काही सापडते का हे पोलिस पाहत होते. समुद्रामध्ये मुलीला मारुन टाकले असावे असा अंदाज हवालदार ठोंबरेनी केला. तपास करत असताना एक काकण घटनास्थळी सापडले. मात्र हे काकण आरोपीचे आहे की मुलीचे हे समजणे कठीण होते.
रात्रीचा गडद काळोख सगळीकडे दाटला होता. रातकिड्यांचा आवाज कानाला दाखवून अस्तित्वाची खूण देत होता. चाकरमान्यांची मुंबई आता निद्रादेवीच्या अधीन होत होती. मध्येच कुठेतरी डान्सबारमधील कर्कश नाचगाण्याचा आवाज घुमत होता. त्यातील तरुणींवर श्रीमंतांची मुलं नोटांची उधळण करत होती. अंधारी रात्र चढत होती. चढणार्या रात्रीत तरुणाई नशेत न्हाऊन निघाली होती. चिंतामण रखवालदार बाहेर बसून पेंगत होता. डुलकी येत असल्याने त्याने माठातील पाणी घेऊन तोंड धुतले अन् तो खुर्चीत पुन्हा येऊन बसला.'आयला, काय या पोरांचं नशीब, नाहीतर आमचं नशीब. पाच हजारसाठी कोल्हापुरातनं इकडं आलो. रात्रभर जागायचं अन् पहाटेला झोपी जायचं, तेही पाड्यात. असतं एकेकाच नशीब, ' असं म्हणून तो गप्प बसला.
आता डान्सबार रंगात आला होता. रात्र चढत होती. तसं कुत्र्याचं भुंकणं वाढत चाललं होतं. मध्येच एक कुत्र चिंतामणच्या जवळून गेलं तसा तो खेकसला.डान्सबारमधील गर्दी कमी झाली होती. चिंतामण उठला. दरवाजा बंद करून किल्ली मॅनेजरच्या हातात ठेवून बाहेर पडला. रात्रीचा तिसरा प्रहर आता सुरु झाला होता. मुंबई शांत होत होती. अंगात उकाडा असह्य होत होता. तसा पाड्यावर जाण्यापूर्वी तो समुद्राकडे वळला. हात पाय धुवूनच खोलीकडे जावे म्हणून. चंद्र मावळतीकडे झुकला होता. मावळत्या चंद्राचं प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यावर दिसत होतं. चिंतामणने ते पाहिलं. त्याला प्रसन्न वाटलं. तो तसाच घराकडे जाण्यासाठी वळला. पण पायात काहीतरी अडकल्यानं तो अडखळला. पाहतो तर ऽऽ त्याला धक्काच बसला. एका लहान मुलीचा मृतदेह पायात पडला होता. तो घाबरला. पण थोड्यावेळानंतर त्यानं पोलिसांना फोन केला. थंड हवेची झुळूक समुद्रावरून येऊन त्यांच्या अंगावर धडकली. तसा तो शहारला.
पहाटेचे आता चार वाजले होते. समुद्र काठाला गस्तीवर असणारे हवालदार ठोंबरे संदेश मिळताच तिथे पोहोचले. चिंतामण तिथेच उभा होता. पोलिसांनी थोडावेळ वाट पाहिली. आतासं स्पष्ट दिसू लागलं होतं. चिंतामणच्या डोळ्यावर झापडं येत होतं. इकडे पोलिसांनी तपास सुरु केला. मृतदेहाचा पंचनामा केला तेव्हा मुलीच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या कसल्याही खुणा नव्हत्या. केवळ गळा दाबल्याचे व्रण स्पष्टपणे दिसत होते. जवळपास काही सापडते का हे पोलिस पाहत होते. समुद्रामध्ये मुलीला मारुन टाकले असावे असा अंदाज हवालदार ठोंबरेनी केला. तपास करत असताना एक काकण घटनास्थळी सापडले. मात्र हे काकण आरोपीचे आहे की मुलीचे हे समजणे कठीण होते. मात्र हे काकण सौंदत्ती डोंगर भागात अधिक वापरतात त्यामुळे या भागाचा आणि खुनाचा काहीतरी संबंध असण्याची शक्यता ठोंबरेंना वाटत होती.
मुंबईतील कोणत्याच पोलिस स्टेशनला लहान मुलगी हरविल्याची फिर्याद नोंद नव्हती. त्यामुळे ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी समुद्रकाठी जवळचा पाडा इकडे मोर्चा वळविला. मात्र दिवसभर फिरुनही मयत मुलीची ओळख पटली नव्हती. दुसरा दिवस उजाडला. चिंतामणला दुसर्या दिवशीही दांडी मारावी लागली. पोलिस तपास करत होते. त्यातच एका उपनगरातील पोलिस स्टेशनला एक मुलगी हरविल्याची फिर्याद नोंद झाली. फिर्याद देणार्या रफीक अन्सारीला बोलावण्यात आले. मृतदेह पाहताच त्याने हंबरडा फोडला. साहेब, ही माझी सना आहे, म्हणून तो रडू लागला. मुलगीची ओळख पटल्यामुळे पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली. रफीक राहत असलेल्या मोहल्ल्यामध्ये पोलिसांनी चौकशी केली. मात्र रफीकचा कुणाशी वैरवाद-तंटा नव्हता. शिवाय रफीकचे स्वत:च्या मुलीवर अतिशय प्रेम होते. रफीकचे कुणाशी वैर नव्हते. तर त्याच्या मुलीचा खून कुणी व कशासाठी करावा? डॉक्टरांच्या अहवालात तिच्यावर अत्याचार झाल्याची नोंद नव्हती. त्यामुळे मारेकरी तिच्या ओळखीचा असावा किंवा घरातीलच असावा हा अंदाज ठेवूनच हवालदार ठोंबरेनी तपास सुरु केला.
रफीक जेवणाचे कंत्राट घेत होता. तो स्वत: चांगला आचारी होता. हाताखाली चार-सहा महिला घेऊनच तो काम करायचा. हवालदार ठोंबरेंनी त्याच्या हाताखाली काम करणार्या सहाही महिलांना चौकशीसाठी बोलावले, मात्र त्यामधूनही काही निष्पन्न झाले नाही. मात्र शयनाज नावाच्या महिलेला दहा रुपये पगार इतरांच्यापेक्षा जादा होता. हे काय गौडबंगाल हे ठोंबरेंना कळेना. त्यांनी शयनाजवर पाळत ठेवली. ती कुणाला भेटते, काय करते, याची संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली.
रफीक अन् शयनाजचे अनैतिक संबंध होते. एवढेच नव्हे तर शयनाज अविवाहीत होती. अन् ती रफिक शिवाय राहूच शकत नव्हती. पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. तिचं राहणीमान पूर्णपणे बेळगावी पद्धतीचे होते. घटनास्थळावर सापडलेले काकण तिथल्याच भागातले होते.चार दिवस पाळत ठेवून शयनाजला अटक करण्यात आली. ती वारंवार समुद्रकाठावर जात होती. हाच एक पुरावा होता. ती पोलिसांना दाद देत नव्हती. तिचे गाव बेळगाव होते. पोट भरण्यासाठी ती मुंबईला आली अन् रफीकच्या प्रेमात पडली. रफीक तिच्यापेक्षा वयाने मोठा होता.
दोन दिवस मार खाऊन मग तिने तोंड उघडले. होय, साहेब मीच मारलं तिला. चांगलंच केल. माझ्या प्रेमाच्या आड येत होती ती ! एकदा आम्ही घरी एकांतात असताना त्या पोरीनं आम्हाला पाहिलं. समजावून सांगूनही तिने ती गोष्ट आपल्या अम्मीला सांगितली. त्यामुळे माझी रफीकशी नेहमीची भेट बंद झाली. मी तडफडायची. पण काही उपयोग नव्हता. अन् मग निर्णय घेतला. या पोरीला संपवून तिच्या अम्मीलाही धडा शिकवायचा. त्या दिवशी ती ट्यूशन-क्लासमधून घरी येत होती. मी तिला बोलावून घेतलं. गोड बोलून तिला फिरायला चल म्हणून समुद्रकाठी नेलं. अन् दिवस मावळल्यावर गळा दाबून पाण्यात टाकून दिली.' असं म्हणून ती रडू लागली. तिला अटक झाली. रितसर खटला चालून तिला तुरुंगवास भोगावा लागला.
-डी. एच. पाटील, म्हाकवे (कोल्हापूर)
Tags : Crime Diary, Kakan