इंटरनेट आणि कॉम्प्युटर असलेल्या या जगात लहानग्यांचे आयुष्य वेगवेगळ्या कारणाने हरवत चाललेले आहे! सातत्याने मोबाईल हातात घेऊन बसणे हे वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून पालकांकडून शिकवले जात आहे. इथून प्रवास होतो सायबर लाईफचा! एका अशा विश्वाचा जे काल्पनिक असते. जे अंतराळात कुठेतरी काहीतरी घडत असते आणि लहानगे त्या काल्पनिक जगात हरवून गेलेले असतात. बालकं तिथे न रमल्यास नवलच आणि हे रमण जेव्हा प्रचंड वेदनादायक आणि धोकादायक बनतं तेव्हा नेट-चॅटच्या भयानक चेहऱ्याचं रूप समोर येतं. ज्याला म्हटलं जातं... सायबर क्राईम. हे लहानग्यांच्या जीवावर देखील उठलं आहे.
जगात सगळ्यात जास्त बघितल्या जाणाऱ्या नेटवरच्या साईटस् म्हणजे पोर्नोग्राफी किंवा लैंगिक संबंधाच्या चित्रण असलेल्या व्हिडीओ क्लिप्स आणि साईटस्, प्रचंड मोठी उलाढाल पैशांची आणि लुटमार या क्षेत्रात चालते. या क्षेत्राने चिमुकल्यांचा देखील वापर करणे सोडलेलं नाही. चाइल्ड सायबर सेक्स ट्रैफिकिंग हा प्रकार यातून उदयाला आलेला आहे. लहान मुलांशी लैंगिक संबंध, फसवून किंवा बळजबरीने ठेवणारी विकृती ज्यांच्यामध्ये असते, त्यांना 'पीडोफाईल' असे म्हटले जाते. अशांची संख्या जगभरात मोठी आहे आणि त्यांच्या वासनेची भूक शमवण्यासाठी पोर्नोग्राफी साईटवर लहान मुलांना बसवले जाते. यामध्ये स्त्रिया देखील आघाडीवर आहेत. पैसे कमावण्यासाठी लहान मुलांची सेक्स करतानाची चित्रे व व्हिडीओ बळजबरीने शिकवून, ती तयार करून, नेटवर टाकली जातात. त्यातून पैसा कमावणे हा प्रमुख उद्देश असतो. एकप्रकारे लहान मुलांचा लैंगिक छळ करणारे हे छायाचित्रण असते आणि त्याचा आनंद ऑनलाईन घेणारे विकृत असे पीडोफाईल असतात.
'द इंटरनॅशनल जस्टीस मिशन' नावाच्या संस्थेतर्फे सर्वेक्षण केल्याप्रमाणे महिन्याला हजारो केसेस लहान मुलांच्या लैंगिक छळाचे चित्रण करणाऱ्या आढळलेल्या आहेत. काही व्हिडीओजमध्ये लहान मुलांवर बलात्कार केल्याचे चित्रण देखील करण्यात येते. ज्याचा विकृत आनंद हे पीडोफाईल घेतात. नेटवर बऱ्याच वेळा अशा प्रकारचे जिवंत चित्रण किंवा लाईव्ह ब्रॉडकास्ट देखील केले जाते. ज्यातून विकृत आनंद घेणारी मंडळी भरपूर पैसे मोजतात. जर लहान मुले तयार नसतील तर त्यांना मारहाण करणे, त्यांचा लैंगिक छळ करणे, धमक्या देणे, त्यांना कोंडून ठेवणे, जेवायला न देणे, झोपू न देणे, असे अनंत छळाचे प्रकार केले जातात. काही ठिकाणी तर गैंग रेप केले जातात. बऱ्याच बालकांना व स्त्रियांना विविध रोगांनी ग्रासले जाते. लैंगिक रोगांबरोबर टीबी व अन्य संसर्गजन्य रोग देखील त्यांना होतात.
अशा प्रकारचे हे सर्व वर्तन गुन्हेगारीमध्ये मोडत असले तरी देखील त्याच्यावर कारवाई करणे हे अत्यंत अवघड बनत चालले आहे, कारण यामध्ये विविध पद्धती वापरल्या जातात. जसे की इनक्रेप्टेड कम्युनिकेशन सिस्टिम्स, सॉफ्टवेअर्स, वायर ट्रान्सफर, क्रिप्टो करेन्सी, वगैरे.
इंटरनेटच्या विश्वात चालणारे हे गुन्हे लहान मुले आणि स्त्रियांना लक्ष्य करतात. ज्याला सायबर सेक्स क्राईम म्हणतात, हे करण्यासाठी फक्त एका खोलीची गरज असते. ज्याला 'सायबर डेन' म्हणतात. जिथे फक्त एक टेबल, कॉम्प्युटर आणि इंटरनेटचे कनेक्शन लागते.
बऱ्याच मुलांना फसवून किंवा धमकी देऊन जेव्हा या व्यवसायात ढकलले जाते तेव्हा ते लैंगिक सायबर अत्याचाराचे बळी ठरलेले असतात. यामध्ये त्यांना वेगवेगळ्या कारणाने वेबकॅमने ब्लॅकमेल केले गेलेले असते. ज्याला सेक्सटॉर्शन असे म्हणतात. हे सगळे करणारे जे असतात ते गुन्हेगार हे आपल्याच नात्यातले किंवा शेजार-पाजारचे जे लोक असतात त्यांच्या लहान मुलांना लक्ष्य बनवतात. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांचे जाळे किंवा स्थानिक गुंड पुंड अशा गुन्हेगारांना मदत करत असतात. मनी लाँडरिंग या पद्धतीने ते गिऱ्हाईकाकडून पैसे जमा करून घेत असतात. या गुन्हेगारी सायबर सेक्ससाठी जे पैसे मोजतात ते आपल्या खासगी आयुष्यात देखील मुलांचा छळ करतात, असे आढळले आहे.
जी मुले-मुली या प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडली आहेत त्यांच्यामध्ये मानसिक विकार आयुष्यभर निर्माण झाल्याचे आढळले आहे. डिप्रेशनबरोबरच पॅनिक डिसऑर्डर हे देखील आढळून आले आहेत. अशी मुले-मुली बऱ्याच वेळा भीतीमुळे आपला होत असलेला वापर इतरांना सांगत नाहीत आणि त्यातून समाजाविषयी आणि स्वतःविषयी एक प्रकारचा तिरस्कार त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. स्वतःला कधीही माफ न करण्याची मानसिकता जर तयार झाली असेल तर अशा मुला-मुलींनी आत्महत्या केल्याची देखील उदाहरणे आहेत. इंटरनेट आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न हे हाताळण्यासाठी सर्व समाजाने जागरूक होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा दिवसभर आज हातात मुले जेव्हा मोबाईल घेऊन बसतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकांना काळ कधीही क्षमा करणार नाही.