ठळक मुद्दे
बेटावद खुर्द येथील २१ वर्षीय युवकाचा टोळक्याकडून बेदम मारहाणीत मृत्यू
मृत्यूप्रकरणी आठ आरोपींना अटक : गुन्ह्यात मॉब लिंचिंगसारख्या कलमांचा समावेश
याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक एसआयटीची स्थापना केली
जळगाव: जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील २१ वर्षीय युवकाचा टोळक्याकडून बेदम मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. आज (दि. १६) आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस प्रशासन उर्वरित आरोपींचा शोध घेत आहे. गुन्ह्यात मॉब लिंचिंगसारख्या कलमांचा समावेश करण्यात आला असून या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एसआयटीची स्थापना केली आहे.
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे १२ तारखेला २१ वर्षीय तरुण सुलेमान रहीम खान पठाण याला टोळक्याने बेदम मारहाण करून बेटावद खुर्द या ठिकाणी सोडून दिले होते. परंतु त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. याप्रकरणी जामनेर पोलिसांनी आठ आरोपी व इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. अटकेतील संशयित आदित्य देवरे (२५ रा. जामनेर), कृष्णा तेली (२१) सोज्वळ तेली (२१), ऋषिकेश मोहोर (१९ सर्व रा. वाकी, ता.जामनेर), अभिषेक राजपूत (२२), दीपक घिसाडी (२०), रंजन उर्फ रणजित माताडे (४८), घनश्याम उर्फ सूरज शर्मा (२० सर्व राहणार बेटावद, ता.जामनेर) यांची पोलिस कोठडी आज (दि. १६) संपली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता 18 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बेटावद खुर्दला भेट दिली. बेटावद खुर्द येथे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ, दिलीपसिंग राजपूत, कुलभूषण पाटील, सामाजिक न्याय विभागाच्या उपाध्यक्ष प्रतिभा शिरसाठ, राष्ट्रवादीचे जळगाव महानगर अध्यक्ष अजाज मलिक, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी बेटावद खुर्द याठिकाणी मयत सुलेमान रहीम खान पठाण यांच्या निवासस्थानी भेट देत विचारपूस केली. मयत कुटुंबाने कॅफे मालक तसेच वाहन चालकावर गुन्हा दाखल का करण्यात येत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत जामनेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणातील इतर आरोपींचे नावे निष्पन्न करून त्यांच्या शोध सुरू आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक एसआयटीची स्थापना केलेली आहे.