जळगाव: युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टराची 7 लाख 30 हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बाबू चव्हाण (वय 52, रा. कापूसवाडी, ता. जामनेर) हे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांच्या मुलाला युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन महेश शांताराम वाघमारे (रा. मुंबई), राहुल शर्मा आणि प्रेरणा कौशिक (रा. दिल्ली) यांनी दिले. त्यानंतर तिघांनी संगनमताने 7 लाख तीस हजार रुपये घेतले आणि महाविद्यालयात प्रवेश न देता फसवणूक केली. आर्थिक फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर सुनील चव्हाण यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील करत आहेत.