जळगाव : जिल्हा पोलीस दलात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदलानंतरही घरफोडी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासात पोलीस यंत्रणा मागेच पडलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) असो की डीबी पथक, सर्वच यंत्रणा या गंभीर गुन्ह्यांच्या उकल करण्यात अपयशी ठरलेल्या आहेत.
गेल्या दीड ते दोन महिन्यांत जळगाव जिल्ह्यातील बहुतांश पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेसह अनेक पोलीस ठाण्यांमध्ये खालपासून वरपर्यंत मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आले.
खून – 25 प्रकरणे दाखल, सर्व उघड
खुनाचा प्रयत्न – 61 पैकी 61 उघड
बलात्कार – 77 पैकी 77 उघड
दरोडे – 9 पैकी 9 उघड
जबरी चोरी – 31 पैकी 29 उघड
सोनसाखळी चोरी – 6 पैकी 6 उघड
घरफोडी – 163 पैकी केवळ 61 उघड
चोरी – 704 पैकी फक्त 248 प्रकरणांची उकल
गंभीर गुन्ह्यांत यश मिळाल्याचे चित्र असले तरी घरफोडी व चोरीच्या प्रकरणांत पोलीस यंत्रणा फसलेली आहे. तब्बल 163 घरफोडीप्रकरणांपैकी केवळ 61 उघड करण्यात यश आले आहे, तर 704 चोरीच्या प्रकरणांपैकी फक्त 248 उघड झाली आहेत. ही आकडेवारी पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
जिल्ह्यात सहा महिन्यांत 32 प्रकरणांमध्ये 40 पिस्तुल, 1 मॅग्झिन व 83 काडतुसे जप्त करण्यात आली असून, 50 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त शस्त्रांची किंमत 10,19,300 इतकी आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र कारवाईत 8 प्रकरणांमध्ये 9 पिस्तुल, 12 काडतुसे जप्त करत 11 आरोपींना अटक केली आहे. या मालमत्तेची किंमत 3,24,400 एवढी आहे.
मध्यप्रदेश सीमेवरील उमर्ती गावातून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी चोपडा पोलिसांवर येथे हल्ला झाल्यानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी थेट गावात जाऊन कठोर कारवाई केली होती.
जिल्ह्यात वाढलेल्या घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अनेकदा तांत्रिक अडचणी व मर्यादा आड येतात. तरीही पोलिसांकडून या गुन्ह्यांच्या उकलासाठी अधिक ठोस उपाययोजना अपेक्षित आहे.