जळगाव: भुसावळ शहरातील बसस्थानकाजवळील क्षेत्र प्रशिक्षण केंद्रासमोरून पाच वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. जळगाव पोलिसांनी अवघ्या काही तासांतच बालिकेचा शोध लावला. तर एका सतर्क होमगार्डच्या तत्परतेमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले आणि बालिकेला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले की, भीक मागण्यासाठी या बालिकेचे अपहरण करण्यात आले होते.
बुधवार ( दि.22 ) रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान, भुसावळ बसस्थानकाजवळील रेल्वे क्षेत्र प्रशिक्षण केंद्रासमोर काजल मुन्ना ठाकूर (वय २९, रा. भाखा अमरपूर, जि. दिंडोरी, मध्यप्रदेश) यांच्या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच, शिरसाळे येथे मारुती दर्शनासाठी जात असलेल्या होमगार्ड पराग सपकाळे यांना बोदवड तालुक्यातील उजनी देवस्थान परिसरात एक व्यक्ती लहान मुलीसह संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. संशय आल्याने सपकाळे यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली.
होमगार्डकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने गोरेलाल भगवानसिंग कछवे उर्फ भिला (रा. अजदरा) याला उजनी देवस्थान येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अपहरण करण्यात आलेल्या बालिकेला सुखरूप सोडवण्यात आले आहे.
तपासात समोर आले की, आरोपीने फिर्यादी काजल ठाकूर यांच्याशी ओळख वाढवून जेवण वाटप करत असल्याचे सांगितले आणि त्याच बहाण्याने मुलीला आपल्या ताब्यात घेतले. आरोपीचा उद्देश बालिकेचा वापर भीक मागण्यासाठी करण्याचा होता. यापूर्वीही त्याच्यावर मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील चैनपूर पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा नोंद असल्याचे स्पष्ट झाले. होमगार्डच्या जागरूकतेमुळे आरोपीला पोलिसांनी जेरबंद करण्यात यश आले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत (भुसावळ), नितीन गणापुरे (जळगाव), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक मंगेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली