जळगाव: इंस्टाग्रामवरील किरकोळ वादाचे रुपांतर भयानक घटनेत झाल्याने 18 वर्षीय तुषार चंद्रकांत तायडे (रा. समतानगर, जळगाव) याची निर्घृण हत्या झाल्याची घटना मंगळवार (दि.2) रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यानंतर उपचार सुरू असताना तुषारचा मृत्यू झाला असून दोन ओळखीतले आणि सहा ते सात अनोळखी अशा संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषारने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शिवीगाळ असलेला व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओवरून संतापलेल्या संशयित आरोपींनी त्याला धडा शिकवण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंगळवारी (दि.2) तुषार परसाडे येथील एका नातेवाइकाच्या अंत्यविधीनंतर मित्राच्या दुचाकीवरून जळगावला परतत असताना, यावल–बोरावल मार्गावरील शेळगाव बॅरेजजवळ त्याचा रस्ता आरोपींनी अडवला.
राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहा–सात अनोळखी व्यक्तींनी तुषारवर लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत तुषारला तातडीने प्रथम यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. बुधवार (दि.3) रोजी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश केला, ज्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे. तुषारच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे आणि इतर अनोळखी आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.