जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एम.डी. (मेथॅनफेटामिन ड्रग्स) प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. 2024 मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा वादात अडकली असून, या प्रकरणाशी संबंधित असलेला जळगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. मात्र, इतक्या महिन्यांनंतरही या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.
भुसावळमध्ये मोठ्या प्रमाणात एम.डी. जप्त झाल्यानंतर त्याचे धागेदोरे जळगाव शहर पोलिसांपर्यंत पोहोचले. शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान, एका आरोपीकडून ‘अब्राहम’ हे नाव समोर आले. त्यानंतर हा संशयित फरार असून त्याचा आजवर काहीच ठावठिकाणा लागलेला नाही.
अब्राहमवर यापूर्वी कोणतेही गुन्हे नोंद नव्हते. परंतु तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी दत्तात्रय पोटे यांच्यासोबत त्याचे 252 वेळा फोनवर संभाषण झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली. परिणामी दत्तात्रय पोटे यांना निलंबित करण्यात येवून त्यांची बदलीही झाली.
या प्रकरणातील सीडीआर (कॉल डिटेल रिपोर्ट) मध्ये आणखी कोणते क्रमांक आहेत, ते कोणाच्या नावावर आहेत, याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे, या प्रकरणात पोटे यांच्याशिवाय आणखी कोणी सहभागी होते का, याचीही चौकशी अर्धवटच राहिल्याचे स्पष्ट होते.
या प्रकरणाची चौकशी तीन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली होती. त्यापैकी भुसावळ व जळगाव उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपले अहवाल दिले आहेत. मात्र एक अहवाल अद्याप सादर झालेला नाही. तो अहवाल काय सांगतो, आणि त्यामध्ये कोणते गंभीर तपशील आहेत, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.
जळगाव पोलिसांनी अनेक खून, दरोडे, अवैध शस्त्रप्रकरणी यशस्वी कारवाई केली असली तरी चोरी, घरफोडी व अंमली पदार्थ प्रकरणांमध्ये मात्र अपयश आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यकाळात अनेक सुधारणा झाल्या, यंत्रणा अधिक आधुनिक बनली, तरीही काही अधिकारी सतत वादात सापडत आहेत, हे खटकणारे वास्तव आहे.
राज्यभरात व राज्याबाहेर गुन्हेगारांचा शोध घेणारी पोलिसांची यंत्रणा या अब्राहम नावाच्या आरोपीला पकडू शकलेली नाही, हेच सर्वात मोठे अपयश मानले जात आहे. एम.डी. प्रकरण विधानसभेत गाजल्यानंतर आता तरी या प्रकरणाचे खरे सूत्रधार कोण हे स्पष्ट होईल का, असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.