जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे खोटे सांगत बनावट ओळखपत्र, लेटरहेड आणि अपॉइंटमेंट लेटर दाखवून जिल्ह्यातील 18 जणांची तब्बल 55 लाख 60 हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी मूळचे पाचोरा येथील रहिवासी हितेश रमेश संघवी (49) आणि त्यांची पत्नी अर्पिता संघवी (45, सध्या राहणार ह.मु., नवी मुंबई) या दाम्पत्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा तत्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, या दाम्पत्याने रेल्वेमध्ये नोकरी, म्हाडामध्ये फ्लॅट वाटप तसेच इतर विविध लाभ देण्याचे आमिष दाखवून नोव्हेंबर 2024 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान तब्बल 18 जणांकडून पैसे उकळले. यात शालिग्राम बारी (32, रा. विठ्ठल पेठ) यांच्याकडून 13 लाख 38 हजार, तर इतरांकडून मिळून 42 लाख 22 हजार अशी एकूण 55 लाख 60 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ही संपूर्ण घटना कालिका माता मंदिर परिसरातील दूध डेअरी परिसरात घडली. डेअरी मालक हर्षल बारी यांच्यासह इतर पीडितांनी अनेक दिवस वाट पाहूनही नोकरी मिळाली नाही किंवा कोणतेही आश्वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हर्षल बारी यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.