क्राइम  Pudhari Police
क्राईम डायरी

जळगाव : वन पथकाची तत्पर कारवाई; शिकारीचा प्रयत्न उधळला, दोन मोटरसायकली जप्त

जळगाव | अज्ञातांच्या शिकारीचा डाव वन पथकाने उधळून लावला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : यावल वन विभागाच्या वैजापूर वनपरिक्षेत्रात शिकार करण्याच्या उद्देशाने प्रवेश केलेल्या अज्ञातांचा डाव वन पथकाने उधळून लावला. गस्तीदरम्यान गावठी बंदुकीचा आवाज ऐकून वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. सुदैवाने कोणत्याही वन्यजीवाला इजा झालेली नाही.

शुक्रवार (दि.16) रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते रविवार (दि.18) रोजी रात्री 11:30 वाजेपर्यंत वैजापूर वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 223, 2225, 226 आणि 232 मध्ये वन पथक गस्त घालत होते. यावेळी कक्ष क्रमांक 232 मध्ये अचानक गावठी बंदुकीने गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला. तत्काळ त्या दिशेने धाव घेतल्यावर वन कर्मचाऱ्यांना काही अज्ञात इसम गावठी बंदुका घेऊन पळताना दिसले.

वन पथकाची चाहूल लागताच आरोपींनी कक्ष क्रमांक 232 मध्ये लपवलेल्या दोन मोटरसायकली घटनास्थळी सोडून दऱ्या-खोऱ्यांचा फायदा घेत पळ काढला. या इसमांनी राखीव वनात अनधिकृतपणे प्रवेश करून शिकार करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले असून, ते परप्रांतीय असल्याचा अंदाज आहे. तपासणीदरम्यान कोणत्याही वन्यजीवाला इजा झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

जप्त केलेल्या दोन्ही मोटरसायकली शासकीय वाहनाद्वारे चोपडा शासकीय आगारात जमा करण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26(1)(ड), (आय), महाराष्ट्र वन नियमावली 9 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9 व 52 यांचा भंग झाल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी वनपाल, वैजापूर यांनी गुन्हा क्रमांक डब्ल्यु2/22/5/2025 नोंदवला आहे.

वनपाल आय.एस. तडवी, संदीप भोई, चुनिलाल कोळी, बाजीराव बारेला, भारसिंग बारेला, संदीप ठाकरे, निखिल माळी, हर्षल पावरा, गणेश बारेला आणि विजय शिरसाठ यांनी ही कारवाई पार पाडली. तर धुळे प्रादेशिक वनसंरक्षक नीनु सोमराज, यावल विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, चोपडा येथील सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, समाधान पाटील आणि वैजापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली.

येथे संपर्क साधण्याचे आवाहन

वनपरिक्षेत्र अधिकारी, वैजापूर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या परिसरात वनवा, अवैध वृक्षतोड, लाकूड वाहतूक, अतिक्रमण, अवैध शिकार किंवा वन्यजीव तस्करी यासारखा कुठलाही प्रकार निदर्शनास आल्यास महाराष्ट्र वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर त्वरित संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT