जळगाव : दीपनगर येथून होणाऱ्या राखेच्या अवैध वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किनी चौफुली परिसरातून अवैधरित्या राख वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. डंपर (क्रमांक एमएच 15 जीसी 9396) मधून अवैध राख वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. दीपनगर येथील राखेच्या निवेदन प्रक्रियेनंतर हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी दीपनगर येथील उपकार्यकारी अभियंता माधव गोविंदराव केंद्रे यांनी भुसावळ तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार आरोपी विजय शिवराम माळी (रा. वडनेर, ता. नाशिक) याने कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अंदाजे ९,६५० रुपये किमतीची सुमारे ५० टन राख चोरी करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहेत.