जळगाव : शहरातील मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्स समोर गुरुवारी (दि. 24) रोजी रात्री वाढदिवस साजरा करत असताना महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (वय २२, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) या तरुणावर अज्ञात इसमांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात महेंद्र गंभीर जखमी झाला असून, गोळी त्याच्या कमरेच्या हाडात अडकली असल्याची माहिती समोर आली आहे.
रामनवमीच्या दिवशी नाचण्यावरून महेंद्र सपकाळे याचा काही तरुणांशी वाद झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा वाद उफाळून आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि.24) रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास भूषण अहिरे याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केक कापण्यासाठी महेंद्र सपकाळे गेला असताना त्याच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात महेंद्रच्या कमरेत गोळी लागली असून, त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, रामानंद नगर व जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड व पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी घटनास्थळी पाहणी करून तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी तपास करताना दोन काडतूस सापडले असून पुढील तपास सुरु आहे.