जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील शिवारात राहणाऱ्या कुवरसिंग पावरा याने पत्नीचा खून केला. या खटल्यामध्ये न्यायालयाने पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे, या प्रकरणांमध्ये मयताच्या मुलांनी आरोपी-वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे या ठिकाणी गिरणा नदीच्या काठावर एका शेतात कुवरसिंग पावरा (राहणार मोहतरमाळ बडवाणी मध्य प्रदेश) याने 18 मार्च 2022 रोजी रात्रीच्या सुमारास पत्नी निनू बाईला "तू दारू का पिलीस ?" असे विचारण्यावरून भांडण सुरू केले. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन रागाच्या भरात कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात जीवघेणा वार केला, यामध्ये अती रक्तस्त्राव झाल्याने निनूबाईचा जागीच मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपीने दारू पिण्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणांमध्ये सरकारी पक्षातर्फे 14 साक्षीदार तपासले गेले, यामध्ये फिर्यादी ज्ञानेश्वर माळी, पंच साक्षीदार डॉक्टर ए वाय शेख, तपास अधिकारी यांचा सभासद व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोपीचा मुलगा गणेश कुवरसिंग पावरा याने न्यायालयात वडिलांविरुद्ध दिलेली साक्ष महत्वाची ठरली आहे. याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले तर आरोपी याला 302 नुसार दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपयांचा दंड न्यायालयाने सुनावला आहे.