जळगाव (भडगाव) : भडगाव शहरातील समीर स्कूल ग्रीनपार्क परिसरासह अन्य भागांतून वाहनांच्या बॅटऱ्या चोरीस गेल्याची प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करत भडगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 63 हजार रुपये किमतीच्या 10 बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
21 जून रोजी रात्री 10 वाजल्यापासून 22 जूनच्या सकाळपर्यंत भडगाव शहरातील विविध भागातून 9 वाहनांमधील सुमारे 53 हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी नासीर खान रशीद खान हा वाहनचालक असून (रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) त्याने भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय वेगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि माहितीच्या आधारे आरोपींच्या तपासात दोन संशयितांचे नावे समोर आली. यामध्ये समीर शेख कदीर शेख आणि शायेब सय्यद मुनव्वर (दोघे रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) या दोघांनीच बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. अटकेनंतर संशयितांनी चोरी केलेल्या बॅटऱ्या पोलिसांच्या ताब्यात दिल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप चौधरी यांनी ही कारवाई पार पाडली.