जळगाव : भुसावळ येथील पापा नगर (ईराणी वस्ती) येथे स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी संयुक्तरीत्या राबवलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये दोन कुख्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मंगळवार (दि.30) रोजी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी हे ऑपरेशन हाती घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) व पोलीस निरीक्षक राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ) यांच्या मार्गदर्शनाखाली ईराणी वस्ती येथे छापा टाकण्यात आला. या छाप्यात संशयित आरोपी तालीय अली रशीद अली (वय 20, रझा टॉवर, पापा नगर) व मोहम्मद अली लियाकत अली (वय 35, रझा टॉवर, पापा नगर) यांना घरातूनच ताब्यात घेण्यात आले आहे.
तालीय अली याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाणे (गुन्हा क्र. १५१/२०२५) व वरणगाव पोलीस ठाणे (गुन्हा क्र. ६२/२०२५) येथे मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासासाठी तालीय अली यास एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर मोहम्मद अली याच्यावर वारला पोलीस ठाणे (जि. बडवाणी, मध्यप्रदेश) येथे फसवणुकीचा गुन्हा (गुन्हा क्र. ३५३/२०२४) दाखल असून, तो फरार होता. त्याला वारला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहम्मद अली याच्यावर हातचलाखी, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हेही दाखल आहेत.
सहायह पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सोपान गोरे, राजू सांगळे, भारती काळे, रवी नरवाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. संशयित आरोपी हे फरार होते. अखेर कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये त्यांना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.