जळगाव : अवैध गॅस भरणा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा पंधरा हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.
अमळनेर शहरातील एका व्यावसायिकाकडे पोलीस कर्मचारी अमोल राजेंद्र पाटील व जितेंद्र रमणलाल निकुंभे यांनी दरमहा हप्ता मागितला होता. हप्ता न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने व्यावसायिकाने अखेर बारा हजार रुपयांवर तडजोड केली.
या प्रकरणी तक्रारदाराने धुळे एसीबीकडे धाव घेतली. एसीबीच्या पथकाने पाचपावली मंदिराजवळ सापळा रचून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांचा पंटर उमेश भटू बारी यांना बारा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या तिघांविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.