जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे ट्रॅक्टरच्या शेडमधून चोरलेले सुमारे ५० हजार रुपये किमतीचे स्पेअर पार्ट पोलिसांनी दोन आरोपींसह जप्त केले आहेत. या प्रकरणात प्रविण पाटील आणि दिलीप निकम यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार प्रितम पुरुषोत्तम बागुल (वय २६), रा. चिंचगव्हाण, यांनी त्यांच्या मालकीचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर (क्र. MH-19 EA-3234) शेडमध्ये लावून ठेवले होते. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने ट्रॉली जोडण्यासाठीचे डाबर, पिना तसेच रोटर नांगरासाठी लागणारे आडवे व उभे हात असे सुमारे ५० हजार रुपयांचे स्पेअर पार्ट चोरून नेले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये रविवार (दि.8) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी शोधण्याच्या सूचना केल्या. त्याअनुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रविण अ. दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या माहितीच्या आधारे प्रविण जालिंधर पाटील (२८) आणि दिलीप श्रीराम निकम (२२, दोघे रा. चिंचगव्हाण) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून सर्व ५० हजार किमतीचे स्पेअर पार्ट जप्त करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, मोहन सोनवणे, किशोर पाटील, शांताराम पबार, विनोद बेलदार यांनी ही कामगिरी पार पाडली.