जळगाव : तालुका हद्दीतील आव्हाणा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत दोन लाख 14 हजार 50 रुपयांचा रोख रक्कम व जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
24 जुलै रोजी जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आव्हाणा शिवारातील प्लॉट नं. 3, हरीकृष्ण नगर, गट नं. 633, कानळदा रोड येथे जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली.
पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत संजय जनार्दन सपकाळे (वय 50, रा. शिवाजी नगर, जळगाव) आणि मयुर कैलास भावसार (वय 32, रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) हे दोघे ‘तीन पत्ती’ नावाचा जुगार खेळताना आढळून आले.
जुगार अड्ड्यावरून रोख ₹2,14,050 आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.