जळगाव : गेल्या महिनाभरात जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ४ ट्रॅक्टर व १ ट्रकवर कारवाई केली आहे. येत्या दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
अवैध वाळू वाहतूक थांबविण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. त्यानुसार विविध उपविभागांत कारवाई करण्यात आली. यामध्ये चोपडा उपविभागात १६ जुलै रोजी चोपडा शहर पोलीस ठाणे हद्दीत वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली. चाळीसगाव उपविभागात २४ जुलै रोजी मेहुणबारे पोलीस ठाणे हद्दीत वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली तर जळगाव उपविभागात ७ ऑगस्ट रोजी गणपतीनगर परिसरातून विनापरवाना वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. ८ ऑगस्ट रोजी जिल्हापेठ पोलीस ठाणे हद्दीत टाटा कंपनीचा ट्रक (MH99 82191) जप्त केला आहे. पाचोरा उपविभागामध्ये ७ ऑगस्ट रोजी भडगाव पोलीस ठाणे हद्दीत वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आला आहे. ही सर्व जप्त करण्यात आलेली सर्व वाहने संबंधित तहसिलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील दंडात्मक कारवाईसाठी सोपविण्यात आली आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता मेरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.