जळगाव : भुसावळजवळील कंडारी गावात ४० वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून होऊन जवळपास तासभर उलटूनही स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही. या भागात पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष हे नविन नसून पूर्वीपासूनच अशीच परिस्थिती असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.
जितेंद्र राजेंद्र साळुंखे कोळी (वय ४०, रा. जळगाव) हे अशोक सपकाळे यांच्या वाहनाचे चालक व अंगरक्षक म्हणून काम करत होते. रविवार (दि.5) रोजी ते अशोक सपकाळे यांच्या मुलांसह पंढरी भागातील संध्या शंखपाळ (रा. कंडारी) यांच्या घरी गेले. रात्री जेवण आणि मद्यपान झाल्यानंतर तिघांमध्ये वाद झाला, त्यातूनच जितेंद्र यांचा चाकूने खून करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तवेरामधून रिदम हॉस्पिटल, भुसावळ येथे नेण्यात आले, मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत मयूर आमोदे आणि बाबू सपकाळे या दोघांना अटक केली. तर सकाळी दीपक वसंत शंखपाळ याला स्थानिक नागरिकांनी अटक करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून राजू अशोक सपकाळे, मयूर दीपक आमोदे, आणि दीपक वसंत शंखपाळ यांचा समावेश असून सर्वांना अटक करण्यात आली आहे.
कंडारी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध मद्यव्यवसाय सुरू असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचा वावरही वाढला आहे. तरीही या भागात पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते. खून झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारीच प्रथम घटनास्थळी दाखल होतात, त्यानंतर स्थानिक कर्मचारी पोहोचतात, ही बाब चिंताजनक आहे.
सकाळी शहर पोलीस ठाण्यात माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकार प्रतिनिधींना ठाणे प्रतिनिधींनी सांगितले की, पोलीस निरीक्षकांच्या आदेशाशिवाय कोणालाही माहिती द्यायची नाही. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विचारणा केल्यानंतर आरोपी अटकेत असल्याचे सांगण्यात आले व पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.