जळगाव : अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे ठेकेदाराच्या भावाचा अमानुष मारहाण करून खून करण्यात आला होता. या खुनातील पाचही आरोपींना अमळनेर पोलिसांनी मध्यप्रदेशातील दुर्गम डोंगराळ भागातून अटक केली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजेच्या तारा ओढण्याच्या कामासाठी दि. २९ मे रोजी मध्यप्रदेशातून पातोंड्यात आलेल्या मजुरांनी ठेकेदार कैलास शामसिंग प्रजापती (रा. पातोंडा) यांना कामाचे पैसे न दिल्याच्या कारणावरून आणि दुसरे मजूर कामावर घेतल्याच्या रागातून अमानुष मारहाण केली होती. लोखंडी पाईप आणि पहारीने त्यांच्या हात, पाय आणि तोंडावर गंभीर वार करण्यात आले. मारहाणीनंतर कैलास हे विकास सोसायटीच्या कार्यालयात रात्रभर बेशुद्ध अवस्थेत पडून होते. दुसऱ्या दिवशी त्यांना अमळनेर, धुळे आणि नंतर इंदूर येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल विजय भोई, पोलीस कर्मचारी राहुल गोकुळ पाटील आणि राहुल नारायण पाटील यांच्या पथकाने मध्यप्रदेशातील डोंगराळ परिसरात सखोल तपास केला. मोबाईल सेलचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांच्या तांत्रिक सहाय्याने व मध्यप्रदेश पोलिसांच्या सहकार्याने जवळपास १०० ते १५० किलोमीटर परिसर पिंजून काढण्यात आला.
शेवटी गोपाल साहुलाल धुर्वे (३५), पंकज उमरावसिंग शिलु (२७), सलीम निर्मलशहा धुर्वे (२२), रोहित बुद्धसिंग शिलु (१९) आणि शिवम फुलसिंग शिलु (१८) – सर्व रा. बीजाधाना, ता. तामिया, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश या पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.