जळगाव: सोशल मीडियावरील किरकोळ वादातून जळगावमध्ये एका तरुणाचा जीव घेणारी धक्कादायक घटना घडली आहे. तुषार चंद्रकांत तायडे (वय १८, रा. समता नगर) याची मंगळवारी (दि.2) सायंकाळी जळगाव–यावल मार्गावरील शेळगाव बॅरेज रस्त्यावर बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु बुधवार (दि.3) रोजी मध्यरात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
असे घडले...
तुषारने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शिवीगाळ असलेला व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावरून संतापलेल्या काही जणांनी त्याला धडा शिकवण्याचा विचार केला. त्यानुसार तुषार मंगळवारी (दि.2) रोजी यावल तालुक्यातील परसाडे येथील एका नातेवाईकाच्या अंत्यविधीहून जळगावकडे परतत होता. त्यावेळी शेळगाव बॅरेज रस्त्यावर संशयित आरोपींनी त्याची दुचाकी अडवून लाथाबुक्क्या आणि लाकडी काठ्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा (गु.र.नं. ४५०/२०२५, कलम १०३(१) व इतर) दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपींची नावे अशी...
विक्रम पंडितराव सोनवणे (वय ४६, रा. सुसदा)
अविनाश सुकलाल सोनवणे (वय २०, रा. सुसदा)
विजय रूपचंद सोनवणे (वय २४, रा. सुसदा)
कल्पेश निलेश इंगळे (वय १९, रा. आसोदा)
निलेश पंडित कोळी (वय २४, रा. बोरनारे)
इतर सहा ते सात अनोळखी आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा वापर करताना संयम ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.