जळगाव : गावठी कट्टा बाळगणारा आणि वरणगाव पोलीस स्टेशनच्या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली. त्याच्याकडून अंदाजे 27,500 किमतीचा गावठी कट्टा व पाच जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्यांविरुद्ध आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या पार्श्वभूमीवर एलसीबीचे श्रीकृष्ण देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फुलगाव फाटा, वरणगाव परिसरात एक इसम गावठी कट्ट्यासह फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोपान गोरे, रवी नरवाडे, गोपाळ गव्हाळे व रविंद्र चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. संशयित आरोपीची ओळख केशव उर्फ सोनू सुनील भालेराव (वय २२, रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) अशी समोर आली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि पाच पितळी राऊंड हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी त्याच्यावर वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशीतून असेही समोर आले की, भालेराव याच्याविरुद्ध यापूर्वीही शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल असून, तो मागील सहा महिन्यांपासून फरार होता. त्याला पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.