जळगाव : पाचोरा शहरात नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या बाळगलेल्या 20 तलवारी जप्त केल्या असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच या कारवाईत सुमारे 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाचोरा पोलिसांना गुरुवार (दि.18) रोजी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माहिजी नाका परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी सोहेल शेख तब्युब शेख (वय 24, रा. स्मशान भूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 18 तलवारी जप्त करण्यात आल्या तर कारवाईपूर्वी विक्री केलेल्या 2 तलवारीही पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत केल्या आहेत.
या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गु.रजि. क्र. 460/2025 नुसार भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3), 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर तसेच कर्मचारी संदीप राजपूत, जितेंद्र पाटील, हरीष परदेशी यांनी ही कारवाई पार पाडली.