जळगाव : भडगाव तालुक्यातील पिंपळगाव थडीचे येथील गिरणा नदीपात्रात गस्तीस गेलेल्या मंडळ अधिकारी दिनेश येंडे यांच्या वाहनावर अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या संशयिताने दगडफेक केली. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (10 जून) मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी दिनेश लक्ष्मणराव येंडे हे अवैध वाळू वाहतूकविरोधी पथकासोबत पिंपळगाव थडीचे येथील गिरणा नदीपात्रात गस्तीसाठी गेले होते. त्यावेळी पिंपळगाव ते भडगाव रस्त्यावरील पीरबाबा दर्गा परिसरात संशयित शिवबा राजेंद्र पाटील (रा. वडधे, ता. भडगाव) याने अधिकाऱ्यांना अडवले व शिवीगाळ करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. या हल्ल्यात मंडळ अधिकाऱ्यांच्या वापरातील वाहन (क्रमांक MH 05-A 8646) ची काच फोडण्यात आली. ही कारवाई शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी करण्यात आली असून, भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.