Dream of Home collapse due to Bribe case
जळगाव : शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई भडगाव तालुक्यातील मांडकी येथे करण्यात आली.
तक्रारदाराला शासनाच्या घरकुल योजनेतून लाभ मंजूर झाला होता. मात्र, दुसरा हप्ता आणि गट नंबर नमुना ८ मिळावा यासाठी मांडकी आणि अंतुरली बुद्रुक येथील ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ (वय ४७) व रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय ३८) यांनी एकूण ६ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
ही तक्रार सोमवार (दि.23 जून) रोजी प्राप्त झाल्यानंतर मंगळवार (दि.24 जून) रोजी पडताळणी केली असता, दोन्ही आरोपींनी पंचासमक्ष तडजोडीनंतर ५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सापळा रचून आरोपींना पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (नंदुरबार) व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव (जळगाव सापळा पथक) पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील, विलास पाटील, पोलीस नाईक हेमंत पाटील व सुभाष पावरा यांनी ही कारवाई पार पाडली.