जळगाव : बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे झालेल्या वादातून गोळीबार करणाऱ्या आरोपीस जळगाव एमआयडीसी पोलिसांनी केवळ 12 तासांत अटक केली आहे. या प्रकरणात एकूण तीन आरोपींना ताब्यात घेऊन 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील राम विश्वास बोरसे आणि दिनेश भरत चौधरी हे बालपणापासूनचे मित्र होते. मात्र, राम बोरसे याचे दिनेशची सख्खी बहीण डींपल चौधरी हिच्याशी 2019 पासून प्रेमसंबंध होते. ही बाब दोन वर्षांनी दिनेश आणि त्याच्या कुटुंबाला कळताच त्यांनी डींपलचे लग्न लावून दिले. मात्र सासरी तिचे मन रमले नाही आणि तिने घटस्फोटासाठी कोर्टात याचिका दाखल केली.
यामुळे संतप्त झालेल्या दिनेशने ‘माझ्या बहिणीचा संसार तुझ्यामुळे बिघडला’ असा ठपका ठेवत राम बोरसेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मंगळवार, दि. 1 एप्रिल रोजी राम बोरसेला मारहाणही करण्यात आली होती. याबाबत राम बोरसेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुरुवार (दि.24) रोजी रात्री राम बोरसे हा त्याच्या एका नातेवाइकाला सोडून घरी परत येत असताना अशोक किराणा चौकात दिनेश चौधरी आणि त्याचे साथीदार त्याला दिसले. राम घरी जेवत असतानाच त्याच्या घराच्या दरवाजावर गोळीबार झाला. त्यामुळे राम बोरसेने घराबाहेर येताच दिनेश आणि दोन इसमांना पळून जाताना त्याने पाहिले. याबाबतही रामने तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
राम बोरसेच्या फिर्यादीवरून आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पाळधी गावात असल्याचे समजले. दोन पथकांनी कारवाई करत दिनेश चौधरी, सागर फुलचंद जाधव आणि आकाश सुनील नागपुरे या तिघांना हॉटेलच्या मागील बाजूच्या ठिकाणी अटक केली आहे.
या कारवाईत आरोपीकडून 30 हजारांचा गावठी कट्टा, 80 हजारांची बजाज पल्सर मोटारसायकल असा एकूण 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अशोक काळे आणि नरेंद्र मोरे हे पुढील तपास करीत आहेत.