संशयास्पद युजर आयडीच्या मदतीने तिकिटे बनविणाऱ्या आरोपीला वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांच्या निर्देशानुसार अटक करण्यात आली आहे.  Pudhari News Network
क्राईम डायरी

जळगाव : रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध काळाबाजार प्रकरणी आरोपी अटकेत

चार लाखाची तिकिटे जप्त

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पुणे सायबर सेलने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश केला असून, संशयास्पद युजर आयडीच्या मदतीने तिकिटे बनविणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय 38 वर्षे, रा. मुकटी, ता. धुळे) असे आहे. मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.26) रोजी पुणे सायबर सेलकडून रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या काळाबाजारामध्ये संलग्न असलेल्या संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे संरक्षण दल (RPF) चौकी, धुळे अंतर्गत चाळीसगाव येथे गुन्हा नोंदवण्यात आला.

विशेष तपास पथकाने आरोपीकडून 243 ई-तिकिटे जप्त केली आहेत. या तिकीटांची एकूण किंमत 4,20,962.50 रुपये आहे. यात 88 आगाऊ प्रवासाची तिकिटे (किंमत 1,78,213.90 रुपये) आणि 155 प्रवास पूर्ण झालेली तिकिटे (किंमत 2,42,748.60 रुपये) यांचा समावेश आहे. तसेच, अवैध तिकिट बुकिंगसाठी वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाइल फोन देखील जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध रेल्वे अधिनियम 1988 च्या कलम 143 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून BNSS कायदा 2023 च्या कलम 35 (3) नुसार नोटीस देऊन त्याला सोडण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक, चाळीसगाव यांच्या नेतृत्वाखाली, एसआयपीएफ आर. के. सिंग, राजेंद्र भामरे व आरक्षक राकेश खलाणे यांच्या विशेष पथकाने केली. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे हे पुढील तपास करीत आहेत. रेल्वे संरक्षण दलाच्या सतर्कतेमुळे अशा अवैध कारवायांना आळा बसत असून भविष्यातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT