जळगाव : एरंडोल तालुक्यामधील उत्रान गावाच्या हद्दीत सर्रास 40 ते 50 ट्रॅक्टर आणि मशिनद्वारे अवैधरीत्या वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाला माहिती दिल्यानंतर देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या आशीर्वादानेच वाळू वाहतूक सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. याप्रकरणी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी कारवाई करत वाळू जप्त केली आहे.
उत्रान गावाच्या हद्दीतून वाहणाऱ्या गिरणा नदीत मोठ्या प्रमाणात वाळू चा दिवसा उपसा सुरू आहे. 40 ते 50 ट्रॅक्टर, 6 क्रेन द्वारे रोज वाळू उपसा करून ख्वाजा मियां दर्गा जवळ तीन ठिकाणी जवळपास सव्वाशे ते दीडशे ब्रास वाळूचा साठा करण्यात आलेला आढळला. या संदर्भात 112 नंबर वरून पोलिसांना माहिती दिली असता अखेर काही तासानंतर पोलीस , तहसील आणि महसूल प्रशासनाद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये जवळपास शंभर ते सव्वाशे ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून नेमकी ही वाळू उपसा करणारे कोण यांचा तपास केला जात आहे. कारवाईला उशीर झाल्याने सर्व ट्रॅक्टर घटनास्थळावरून पळून गेल्याने प्रशासनाच्या हाती फक्त रेतीचे ढिगारे लागले आहेत.
112 या नंबर वर अतिशय शीघ्र मदतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस प्रशासन द्वारे करण्यात येते. मात्र 112 नंबर वर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर देखील जवळपास दोन तासानंतर पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर अखेर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून होणाऱ्या या विलंबावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उत्रान गावामध्ये रेती माफिया कोण? साठा केलेली वाळू कुणाची आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.
रवंजे येथे देखील मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने वाळूची तस्करी केली जात आहे. येथे देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरने गिरणा नदीतून वाळूचा उपसा केला जात असून त्याचा अनेक ठिकाणी साठा केला जात आहे. या सर्व साठ्यांबद्दल पोलीस आणि तहसील प्रशासनाला नेमकी माहिती कशी मिळत नाही किंवा प्रशासनाचाच आशीर्वादाने काम सुरु असल्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रवंजें गावच्या हद्दीत देखील अनेक ठिकाणी रेतीचा साठा केलेला आढळून येतो. रात्रीच्या अंधारात देखील येथून रेतीची डंपर मार्फत वाहतूक केली जात असल्याचे समोरे आले आहे. अनेक तक्रारीनंतर देखील प्रशासनाकडून कोणतेही कारवाई होत असल्याची नागरिकांची ओरड आहे.
100 ब्रास वाळू जप्त करण्यात आलेली आहे. काही जणांनी 112 ला तक्रार करून याबद्दल माहिती दिली होती, तक्रारीनुसार कारवाई करताना सर्कल अधिकारी श्री शिंपी, तलाठी शिवाजी घोलप, नरेश शिरूर, पोलीस पाटील पप्पू तिवारी, पोलीस पाटील राहुल महाजन व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. जप्त केलेली वाळू वाहून नेण्याचे काम सुरू आहे.तलाठी शिवाजी घोलप उत्रान गाव, तालुका एरंडोल, जळगाव.