Esmail Qaani | घरभेद्याला इराणनेच घातल्या गोळ्या..! 
क्राईम डायरी

Esmail Qaani | घरभेद्याला इराणनेच घातल्या गोळ्या..!

पुढारी वृत्तसेवा

प्रत्येक युद्ध शस्त्रास्त्रे आणि सैन्यबळाच्या जोरावर जिंकता येत नाही. त्यासाठी आवश्यक असते ती एक प्रकारची कूटनीती, शत्रूच्या बलस्थानांची आणि कच्च्या दुव्यांची अचूक माहिती..! अशावेळी कामी येतात ते गुप्तहेर! जवळपास प्रत्येक देशांचे जगभरात गुप्तहेरांचे एक जाळे विणलेले असते. हे गुप्तहेरच शत्रूराष्ट्रांची बित्तंबातमी आपापल्या देशांना कळवीत असतात. युद्ध आणि गुप्तहेर हे दोन्ही एकमेकांशी अत्यंत घट्टपणे जोडलेले विषय आहेत.

आपल्या देशाची ‘रॉ’ ही नावाजलेली गुप्तहेर संघटना आहे. इस्रायलची मोसाद, अमेरिकेची सीआयए आणि एफबीआय, ब्रिटनची एमआय-6 आणि एमआय-5, रशियाची एफएसबी आणि केजीबी, चीनची एमएसएस आणि कॅनडाची सीएसआयएस अशा जगातील काही प्रमुख आणि नामवंत गुप्तहेर संघटना आहेत. युद्धकाळात आणि शांततेच्या काळातही गुप्तहेरांचे काम अव्याहतपणे सुरूच असते. जगात अनेक नामवंत आणि गाजलेले गुप्तहेर होऊन गेलेले आहेत. त्यांनी आपल्या कामगिरीने इतिहासाच्या पाना-पानांत आपली नावे कोरून ठेवली आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांचा निकाल तर गुप्तहेरांच्या कामगिरीमुळे लागलेला दिसतो. दुसर्‍या महायुद्धा दरम्यान ब्रिटन आणि अमेरिकेच्या गुप्तहेरांनी नाझी जर्मनीचे गुप्त संदेश फोडले होते, त्यामुळे युद्धाचे पारडे फिरून हिटलर आणि जर्मनीचा पराभव झाला होता. सध्याच्या काळात केवळ व्यक्तीच नाही, तर तंत्रज्ञानाच्या मदतीने (सायबर-एआय) गुप्त माहिती मिळवणे हे युद्धाचे एक मुख्य हत्यार बनले आहे.

मात्र, असेही काही गद्दार गुप्तहेर असतात की, जे ‘डबल गेम’ करीत असतात, म्हणजे एकीकडे आपल्या देशाचा गुप्तहेर म्हणून काम करीत असतानाच आपल्याच देशाची गोपनीय माहिती शत्रूराष्ट्रांनाही पुरवीत असतात. भल्यामोठ्या आर्थिक किंवा अन्य आमिषापोटी ही मंडळी अशी गद्दारी करताना दिसतात. गुप्तहेरांच्या दुनियेत प्रामाणिक गुप्तहेरांच्या बरोबरीने अशा गद्दार गुप्तहेरांची देखील रेलचेल माजलेली दिसते. अशा गद्दार गुप्तहेरांना ‘डबल एजंट’ म्हणतात; पण त्यांची ही चालगिरी फार काळ चालू शकत नाही, एक ना एक दिवस ही मंडळी पकडली जातात आणि गद्दारीचा शिक्का माथी घेऊनच मातीआड होतात. हे सगळे गुप्तहेर पुराण आठविण्याचे कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्धात सापडलेला इराणी घरभेद्या ‘इस्माईल कानी’ हा डबल एजंट!

इस्माईल कानी हा इराणच्या एलिट कुदस् फोर्स या गुप्तहेर संस्थेचा प्रमुख होता. मात्र, तो एकीकडे इराणशी इमान राखत असल्याचे नाटक करीत असतानाच इस्रायलच्या मोसाद संघटनेसाठीही काम करीत होता. इराणचे सवोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना ठार मारण्याचा प्लॅन इस्रायलच्या मोसाद या संघटनेने अनेक वर्षांपासून करून ठेवलेला होता. पण, त्यात त्यांना यश येत नव्हते. अखेर याकामी मोसादला मदत झाली ती इस्माईल कानीची! खामेनी यांच्या गुप्त ठिकाणांची, बैठकांच्या जागांची, निवासस्थानाची खडा न खडा माहिती इस्माईल कानी यानेच मोसाद आणि अमेरिकेला पुरविल्याचे चव्हाट्यावर आले आहे. ज्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त फौजांनी अयातुल्ला खामेनी आणि इराणच्या बहुतांश लष्कर प्रमुखांची हत्या केली, त्या बैठकीची सगळी माहिती इस्माईल कानी यानेच पुरविल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

इस्माईल कानीचा हा दुग्ललपणा उघड होण्याचे कारणही आता पुढे आले आहे. इस्रायलने यापूर्वी एकदा खामेनी यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी खामेनींवर जो हल्ला झाला, नेमका त्याचवेळी त्या ठिकाणी इस्माईल कानी गैरहजर होता. परवा इस्रायलने खामेनींवर जो निर्णायक हल्ला केला, त्यावेळी इराणचे झाडून सगळे लष्करी अधिकारी हजर होते; पण नेमका इस्माईल कानीच त्यावेळीही तिथे उपस्थित नव्हता. या दुव्यांवरूनच इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डनी इस्माईल कानीचा दुग्ललपणा हेरला आणि त्याच्या पापाचे माप त्याच्या पदरात टाकून त्याला यमसदनी धाडले. इस्माईल कानीला रिव्हॉल्युशनरी गार्डनी गोळ्या घालून ठार मारले. इराणने अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी संयुक्त अरब अमिरातीतील ‘द नॅशनल’ नावाच्या दैनिकाने याबाबतची बातमी जगजाहीर केलेली आहे. इस्रायलच्या मोसाद या संघटनेशी अंतर्गत हातमिळवणी केल्याच्या संशयावरून इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डनी इस्माईल कानीला त्याच्या कर्माची शिक्षा दिल्याचे ‘द नॅशनल’च्या वृत्तात म्हटले आहे.

एकूणच काय, तर कोणत्याही देशाच्या द़ृष्टीने गुप्तहेर हे महत्त्वाचे असतातच; पण तेच जर उलटले तर केवढा अनर्थ ओढवू शकतो, हे खामेनींच्या हत्येवरून स्पष्ट झाले आहे. शेवटी कोणत्याही गद्दार गुप्तहेराची अखेरही अशाच पद्धतीने होत असते.

- विशेष प्रतिनिधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT