जळगाव : चाळीसगाव शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाकडून तीन लाखांची खंडणी मागून एक लाख वीस हजार रुपये उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ कारवाई करत चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची बदली नियंत्रण कक्षात केली असून, संबंधित कर्मचारी अजय पाटील याला देखील निलंबित करण्यात आले आहे.
चाळीसगावमधील एका कंप्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटचे मालक स्वप्निल राखुंडे रविवार (दि.18) रोजी पोलीस कर्मचाऱ्याने “निखिल राठोड कोण आहे?” अशी विचारणा करत क्लासमध्ये एका अल्पवयीन मुलीशी संबंधित घटना घडली असून, तुझ्यासह तुझ्या कुटुंबीयांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल," अशी धमकी दिली. त्यानंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली.
राखुंडे यांनी सुरुवातीला मित्राकडून ५० हजार रुपये उधार घेऊन दिले आणि नंतर ७० हजार रुपये दिले. त्यानंतर मित्रांच्या सल्ल्याने सोमवार (दि.19) रोजी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर आमदार मंगेश रमेश चव्हाण यांच्यासमवेत शहर पोलीस ठाण्यात चार तासांचा ठिय्या दिला. याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची बदली केली तसेच आरोपी हवालदार अजय पाटील याचेही निलंबनही करण्यात आले असून, उकळलेले 1.20 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
"नागरिकांना संरक्षण देण्याऐवजी जर कायद्याचे रक्षकच भक्षक बनून खंडणी उकळत असतील, तर हे सहन केले जाणार नाही. मी या प्रकरणी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार करणार असून, यामधील सर्व पोलिसांची चौकशी IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून व्हावी, अशी मागणी करणार आहे."मंगेश चव्हाण, आमदार, जळगाव