क्राईम डायरी

दारूमुळे वाढली गुन्हेगारी  | पुढारी

Pudhari News

श्रीकांत देवळे

स्वातंत्र्यप्राप्तीपासून आतापर्यंत दारूच्या विक्रीत 60 ते 80 पट वाढ झाली आहे. दारूची नशा घराघरात पोहोचली आहे. अपघातांपासून गुन्हेगारीच्या घटनांपर्यंत अनेक ठिकाणी दारू हेच प्रमुख कारण ठरल्याचे आढळून येत आहे. परंतु दारूविक्रीतून मिळणार्‍या महसुलावर पाणी सोडणे सरकारला जमत नाही. आपल्याला एक सशक्त समाज आणि देश घडवायचा असेल, तर सरकारने दारूतून मिळणार्‍या महसुलाचा मोह टाळायला हवा.

दारू ही सर्व पापांची जननी आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हटले होते. दारू माणसाला शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आर्थिकद़ृष्ट्या बरबाद करते, असे ते सांगत असत. दारूच्या नशेने मनुष्य दुराचारी बनतो. 'शराब' या शब्दासंबंधी असे सांगितले जाते की, हा एक अरबी शब्द आहे. शरमाना, बुराई आणि आब म्हणजे पाणी. अर्थात सर्व वाईट गोष्टींचे मूळ असलेले पाणी असा 'शराब' या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. रम, व्हिस्की, बीअर, महुआ, ब्रँडी, जीन, देशी अशा सर्व प्रकारची दारू सारखीच. कारण सगळ्यात अल्कोहोल असते. 

या सर्वांना आपण 'शराब'च म्हणतो. सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचे दारू हे मूळ मानले जाते. दारूमुळे गुन्ह्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. दारूच्या नादी लागून युवक आयुष्य बरबाद करून घेत आहेत. दारूची सवय लागल्यामुळे युवा पिढी योग्य मार्ग सोडून चुकीच्या मार्गावरून वाटचाल करू लागली आहे. महिलांचा अवमान होत आहे. चोरी, हत्या, अत्याचार, अपघात अशा घटनाही बहुतांश दारूमुळेच घडत आहेत. भारतात दारूने अक्षरशः धुमाकूळ घातला असून स्थिती भयावह होत चालली आहे.

एका सरकारी सर्वेक्षणाचा अहवाल असे सांगतो की, आज घराघरात दारू पोहोचली आहे. परंतु हे का शक्य झाले? सरकार स्वतःच दारूच्या धंद्यांना उत्तेजन देत आहे. परवाने वाटून महसूल गोळा करीत आहे आणि त्यातून कल्याणकारी योजनांचे संचालन करीत आहे. अशा स्थितीत मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्यास त्याचे आश्चर्य वाटायला नको. देशात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांत मद्यपींची संख्या वाढत आहे. यामागील वास्तव असे की, दारूच्या व्यवसायांपासून मिळणार्‍या महसुलावर पाणी सोडायला सरकार तयार नाही. 

केंद्र आणि राज्य सरकारे मद्याच्या व्यवसायातून मिळणार्‍या महसुलातून अनेक कल्याणकारी योजना चालवितात आणि त्यात रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यामुळेच दारूमुळे होत असलेल्या प्रचंड नुकसानीची माहिती असूनसुद्धा सरकार दारूवर बंदी आणत नाही. आपल्या समाजात नशा ही नेहमीच वाईट गोष्ट मानण्यात आली आहे आणि समाजाने ते स्वीकारलेही आहे. सर्वाधिक नशा दारूचीच केली जाते. अनेक प्रकारच्या वाईट गोष्टींचे मूळ दारूमध्ये आढळून येते. दारू प्यायल्यामुळे विवेकाने विचार करण्याची माणसाची शक्ती कमकुवत होते. तो आपले भले-बुरे, हित-अहित कशाचाच विचार करू शकत नाही. दारू सेवन केल्यामुळे माणसाच्या शरीर आणि बुद्धीबरोबरच आत्म्याचाही र्‍हास होतो. दारू पिणार्‍या व्यक्ती अनेक आजारांनी ग्रस्त होतात. आजच्या काळात आधुनिकतेच्या शर्यतीत श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत आणि लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत अनेक जण या सवयीचे गुलाम बनले आहेत.

एका सर्वेक्षणानुसार, भारतात दारिद्र्यरेषेच्या खाली असणार्‍या कुटुंबांमधील जवळजवळ 37 टक्के लोक नशापान करतात. ज्यांच्या घरात खायला भाकरी नाही, अशा व्यक्तींचाही त्यात समावेश आहे. ज्या कुटुंबांकडे घरदार आणि कपडेलत्तेही नाहीत आणि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, अशा कुटुंबातील कर्त्या व्यक्ती मजुरी करून जे कमावून आणतो, ती रक्कम दारूत उडवतो. या लोकांना आपल्या कुटुंबीयांचीही चिंता नसते. घरात खायला काही नाही, कुटुंबीय भुकेने तडफडत असतील, हेही त्यांना उमजत नाही. 

अशा लोकांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. आपण दुःख विसरण्यासाठी दारू जवळ करतो, असे यातील बहुतांश लोक सांगतात. त्यांचे कुटुंब जेव्हा उपाशीपोटी झोपल्याचे पाहायला मिळते, तेव्हा त्यांचा हा तर्क किती आधारहीन आहे, हे स्पष्ट होते. युवकांमध्ये नशा करण्याच्या वाढत्या सवयीमुळे शहरी आणि ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. दारूबरोबरच नशेच्या औषधांचाही उपयोग केला जातो आणि अशा युवकांकडून गुन्हेगारी कृत्ये घडतात. हिंसा, बलात्कार, चोरी, आत्महत्या अशा अनेक गुन्ह्यांमागे नशा हे मोठे कारण असल्याचे पाहायला मिळते. दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होणारे अपघात, विवाहित पुरुषांकडून नशेत पत्नीला होणारी मारहाण या नित्याच्या घटना झाल्या आहेत. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशभरात दारूची विक्री 60 ते 80 पटींनी वाढली आहे. दारूच्या विक्रीमधून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो, हेही खरे आहे. परंतु अशा प्रकारच्या कमाईमुळे आपली सामाजिक व्यवस्था छिन्नविच्छिन्न होत चालली आहे. तसेच कुटुंबेच्या कुटुंबे बरबाद होत चालली आहेत. आपण वेगाने विनाशाकडे वाटचाल करू लागलो आहोत. 

देशात दारूबंदीसाठी अनेकदा आंदोलने झाली आहेत. परंतु सामाजिक, राजकीय जाणिवेच्या अभावी ही आंदोलने यशस्वी झाली नाहीत. समाजाच्या हितासाठी सरकारला दारूमुळे मिळणार्‍या महसुलाचा मोह टाळावा लागेल. तरच समाज आणि देश मजबूत होऊ शकेल आणि आपण या घातक नशेपासून आपला समाज मुक्त ठेवू शकू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT