अलिबाग : सुवर्णा दिवेकर
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मद्यविक्री करण्यासंदर्भातील नियमावली कठोर आहे. मात्र मद्यविक्रेते या नियमावलीचे पालन सर्रास करताना दिसत नाहीत. कोणीही यावे दारू घेवून जावे असा प्रकार सुरू आहे.
परवाना असलेल्या व्यक्तीलाच दारू देणे बंधनकारक आहे अन्यथा अशा विक्रेत्याला किंवा बारचालकाला 25 ते 30 हजार रूपयांपर्यंत दंड होवू शकतो. रायगड जिल्हयातील दारू विक्री आणि परवाना असलेल्यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात परवाना नसतानाही दारू पिणार्यांना सर्रास दारू विकली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
वितरित झालेले परवाने
जानेवारी - 78
फेब्रुवारी - 46
मार्च - 50
एप्रिल - 39
मे - 36
आजीवन परवाना - 11 हजार 395
दारू पिण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवान्याची गरज असते. या साठी 21 वर्षे ही वयोमर्यादा आहे. वयाची 21 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला हा परवाना एक दिवस, एक वर्ष किंवा आजीवन मिळू शकतो. त्यासाठी उत्पादन शुल्क वि भागाकडून शुल्क आकारले जाते. एक दिवसाचा परवाना 5 रूपयांत, वर्षभराचा परवाना 100 रूपयांत तर आजीवन परवाना 1 हजार रूपयात मिळतो.
मद्यसेवन करण्याचा परवाना ऑनलाईन देण्याची सुविधा आहे. त्या करिता आधारकार्ड आवश्यक आहे. एक वर्ष किंवा आजीवन परवान्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज करावा लागतो. त्यासाठी डॉक्टरांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
रायगड जिल्हयात दारू पिणार्यांच्या संख्येच्या तुलनेत दारू पिण्याचा परवाना घेणार्यांची संख्या खूपच कमी आहे. जिल्हयात दारू पिण्याचा आजीवन परवाना घेतलेल्यांची संख्या 11 हजार 395 इतकी आहे. तर दरमहा वार्षिक परवाना घेणार्यांची संख्या 100 देखील नाही. असे असताना जिल्हयातील दारू दुकानांवर सर्रास गर्दी पहायला मिळते. शनिवार रविवारी, सणावाराला किंवा उत्सवांच्या काळात ही गर्दी ओसंडून वहात असते. मात्र दारू परवाने आणि विक्री यातील विसंगतीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मुंबईला लागून असलेला रायगड जिल्हयात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे शनिवार, रविवारी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असलेल्या दारूच्या दुकानांवर तोबा गर्दी पहायला मिळते.
परवाना नसताना दारू बाळगणे किंवा परवाना नसलेल्यांना दारू विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे मद्यविक्रेत्यांना यासंदर्भात योग्य ती खबरदारी घ्यावी असे कायदा सांगतो. ग्राहकाकडे परवाना आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी विक्रेत्याची आहे. परंतु कोणताच विक्रेता या नियमांचे पालन करताना दिसत नाही. एकाही ग्राहकांला दारू पिण्याचा परवाना विचारला जात नाही, असे असले तरी मद्य विक्रेते त्याचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवत असतात.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांच्याकडे दारू पिण्याच्या परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक यांच्याकडून ऑफलाइन प्रणालीव्दारे परवाना मिळवण्याची सोय आहे.विदेशी दारूसाठी प्रतिमहिना 12 युनिट तर देशी करिता दरमहा दोन युनिट दारू बाळगण्याची मुभा कायद्याने दिली आहे. दारू पिण्याचा वर्षभराचा परवाना असेल तर दरमहा 12 युनिट विदेशी तर दरमहा 2 युनिट देशी दारू विकत घेता येते.