illegal abortion | प्लास्टिकच्या पिशवीत कोंबलेली अर्भकं अन् रक्ताच्या कमाईवर उभारलेले बंगले; गर्भपात रॅकेटचे अंगावर काटा आणणारे सत्य 
क्राईम डायरी

illegal abortion | प्लास्टिकच्या पिशवीत कोंबलेली अर्भकं अन् रक्ताच्या कमाईवर उभारलेले बंगले; गर्भपात रॅकेटचे अंगावर काटा आणणारे सत्य

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद अडसुळे, छ. संभाजीनगर

शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अवैध गर्भपात करणार्‍या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे प्रकार समोर आले. यामध्ये सातारा परिसरातील कुख्यात डॉ. राजपूतची टोळी असो, नारेगावात यूट्यूबवरून लिंगनिदान शिकून गर्भपात चालवणारा 12 वी पास वॉर्डबॉय असो, किंवा सिल्लोडमध्ये छातीठोकपणे अर्भके मातीत पुरणारा डॉ. ढाकरे असो, या सर्वांनी शहरात अक्षरशः मृत्यूचा बाजार मांडला आहे. हा केवळ पैशांचा गोरखधंदा नाही, तर थंड डोक्याने चालवलेला एक संघटित कट आहे. पैशांच्या लालसेपोटी माणुसकीचे आणि निष्पाप जीवांचे हत्याकांडच घडविले जात आहे.

तपासाचे धागेदोरे जसे उलगडत आहेत, तसे अंगावर काटा आणणारे सत्य समोर येत आहे. अवघ्या 15 ते 80 हजारांच्या बोलीवर या नकोशीचा सौदा होतोय. डॉ. राजपूतसारखे सराईत गुन्हेगार जेलची हवा खाऊनही पुन्हा याच काळ्या धंद्यात सक्रिय होतात, तर ज्योती पवारसारख्या परिचारिका या निष्पापांच्या रक्ताच्या कमाईवर लाखो रुपयांचे आलिशान बंगले आणि गाड्या उडवतात. निल्लोडचा डॉ. अहिरे गर्भवती महिलांना डॉ. राजपूतकडे तपासणी करण्यासाठी कमिशन घेऊन पाठवत होता. सर्वात सुन्न करणारी बाब म्हणजे गर्भपातानंतर नर्स ज्योती पवार, वर्षा जाधव या दोघी अर्भक चक्क एका प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून तुम्हीच विल्हेवाट लावा, असे सांगत नातेवाईकांच्या हाती सोपवत होत्या. एका गर्भपातासाठी टोळी 80 हजार उकळत होती. दुसरीकडे, नारेगावात तिसरीही मुलगीच होणार म्हणून सासरच्यांनीच बळजबरीने गोळ्या खाऊ घालत एका असहाय्य मातेचा गर्भ ओरबाडून काढल्याचा संतापजनक प्रकार काही दिवसांपूर्वी घडला.

दोन वर्षांपूर्वी सिल्लोडमध्ये तर रात्रीच्या अंधारात गर्भपात करून मोकळ्या माळरानावर, नाल्यांमध्ये या चिमुकल्यांचे मृतदेह पुरले गेले. गुन्हेगारांचे हे जाळे इतके खोलवर रुजले आहे की, पोलिसांची चाहूल लागताच हॉस्पिटलचा बोर्ड आणि पुरावे एका झटक्यात गायब केले जातात. पार्सल किंवा बचत गटाची मीटिंग अशा कोडवर्डच्या आडून हे जीवघेणे रॅकेट बिनदिक्कत सुरू आहे. आठ दिवसांपूर्वी मुकुंदवाडीत रस्त्यावर पाच महिन्यांचा गर्भ फेकण्यात आल्याचे उघड झाले होते. पैशांच्या आणि मुलगी नको या मानसिकतेतून निर्माण झालेल्या अशा सिंडिकेटमध्ये रोज अजून किती नकोशी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळल्या जात आहेत किंवा काळोख्या मातीत गाडल्या जात आहेत, हा अस्वस्थ करणारा प्रश्न कायम आहे.

पैशांच्या हव्यासापोटी चाललेला हा मृत्यूचा बाजार केवळ पोलिसांच्या कारवाईने थांबणार नाही, मुलगी नको ही विषारी विचारसरणी जोपर्यंत आपण मुळासकट उखडून फेकत नाही, तोपर्यंत अशा पांढरपेश्या कसायांचे फावतच राहील. समाजाने आता केवळ बघ्याची भूमिका सोडून या नकोशीच्या जगण्याच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT