नाशिक : आजारपणामुळे पत्नी गेल्या साडे तीन वर्षांपासून अंथरुणाला खिळून असलेल्या पत्नीच्या वेदना सहन हाेत नसल्याने सेवानिवृत्त प्राध्यापकाने पत्नीचा गळा आवळून खून केला. तसेच स्वत:ही गळफास घेत जीवन संपवल्याची करुण घटना जेलरोड भागात घडली. जीवनयात्रा संपविण्यापूर्वी पतीने "मला तीचे हाल बघवत नाही, माझं पत्नीवर खुप प्रेम आहे, तिला मी मुक्त करत आहे.... व मी पण मुक्त होत आहे " अशा आशयाची चिठ्ठी लिहल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लता मुरलीधर जोशी (७६) असे खुन झालेल्या वृद्धेचे नाव असून मुरलीधर रामचंद्र जोशी (८०) असे खून करून जीवन संपवणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. जेलरोड येथे सावकर नगरातील एकदंत अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर मागील अनेक वर्षांपासून जोशी दाम्पत्य वास्तव्यात आहेत. लता जोशी या आजारपणामुळे सुमारे साडेतीन वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. बुधवारी (दि.९) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोलकरीण घरातून काम आटोपून निघून गेल्यानंतर मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठी लिहून पत्नी लता यांचा गळा आवळला व त्यानंतर स्वत:ही गळफास घेतल्याचे उपनगर पोलिसांनी सांगितले. सायंकाळी सातच्या सुमारास स्वयंपाकासाठी मोलकरीण घरी आल्यानंतर मुरलीधर जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर लता जोशी पंलगावर निपचीत आढळल्या. उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मुरलीधर जोशी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाेशी यांचे दोन्ही मुले नवी मुंबई, मुंबईत राहत असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
मुरलीधर जोशी व त्यांच्या पत्नी लता जोशी या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या. त्यांचा एक मुलगा संदीप जोशी हे पनवेल येथे प्राचार्य असून दुसरा मुलगा प्रसन्ना जोशी हे मुंबईत राहत असून त्याचा लघुउद्योग आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने मुरलीधर जोशी यांचे परिसरातील नागरिकांसोबत चांगले संबंध होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आत्महत्येपूर्वी मुरलीधर जोशी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माझे पत्नी लतावर खूप प्रेम आहे. ती अंथरुणाला खिळून असून आजाराला वैतागली आहे. तिला या आजारातून मुक्त करण्यासाठी व तिच्यासोबत मी पण मुक्त होत आहे. काम करणाऱ्या सीमा हिने पत्नी लता हिची खूप सेवा केली. तिच्यासाठी ५० हजार रुपये बाजूला काढून ठेवले असून ते तिला द्यावे.
तसेच आमच्या दोघांच्या अंत्यसंस्काराचे पैसेदेखील ठेवले असून अंत्यसंस्कारासाठी कोणीही खर्च करू नये. पत्नी लता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नवीन साडी, मंगळसूत्र, जोडवे असे सर्व घालून अंत्यसंस्कार करावे. अशी इच्छा मुरलीधर जोशी यांनी चिठ्ठीत वर्तवल्याचे पोलिसांनी सांगितले.