गणेश मानस, सांगली
काही वर्षांपूर्वी सांगली, मिरजेतील वेश्यावस्तीमध्ये पोलिसांनी छापा टाकून पश्चिम बंगालमधील परप्रांतीय मुलींना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अधिक माहिती काढली असता, पश्चिम महाराष्ट्रात दलालांची टोळी असल्याचे उघडकीस आले. ही टोळी नेपाळ, बांगला देश येथील दलालांशी संपर्कात असल्याचे दिसून आले. या ठिकाणच्या मुलींचे ट्रॅफिकिंग करून काही महिन्यांसाठी म्हणून त्यांची खरेदी केली जाते. त्यांचा महिन्याचा पगार ठरविण्यात येतो. त्यांना सांगली सारख्या ठिकाणी एखाद्या लॉजमध्ये अथवा एखाद्या बंगल्यात त्यांची व्यवस्था केली जाते. दररोज वेश्यावस्तीत पाठवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जातो. त्यांचा करार संपल्यानंतर त्यांना दुसर्या ठिकाणी पाठवले जाते. परप्रांतातील मुलींना अनेकवेळा ताब्यात घेतले आहे. परंतु, पोलिसांच्या तपासाची गती मात्र पुढे वाढली नाही. सांगलीत एक पोलिस अधिकारी सध्या एका प्रकरणात तुरुंगात आहे. त्याच्याशी या दलालांचे लागेबांधे असल्याचे सांगण्यात आले. दलाल अगोदर त्याच्याशी करार करीत. तो स्वत: त्या मुलींना उपभोगायचा. त्याला हप्ते ठरलेले असायचे आणि बिनबोभाट हा व्यवसाय सुरू असायचा.
मागणी-पुरवठा नियम! : नेपाळ, बांगला देशातून आणलेल्या मुलींना ठिकठिकाणी पाठवले जाते. काही वर्षांपूर्वी दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धा होत्या. त्यावेळी परदेशातील, परप्रातांतील आणलेल्या मुलींना काही दिवसांसाठी दिल्लीतील वेश्या व्यवसायात पाठवण्यात आले. स्पर्धा संपेपर्यंत त्या ठिकाणी मुली व्यवसाय करीत होत्या.
आणखी काही प्रकार! : आजकाल राज्यभर मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी बोकाळलेली दिसत आहे. अनेकदा काही गोरगरीब महिला या खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकतात. त्यांना सावकारी पाशातून सोडविण्याचे आमिष दाखवून काही महिलाच अशा परिस्थितीने गांजल्या गेलेल्या महिलांना वेश्या व्यवसायाच्या दुष्टचक्रात ढकलत असल्याचीही काही उदाहरणे पुढे आली आहेत. कर्जदार महिलेच्या अगतिकतेचा फायदा घेऊन दलाल महिला तिला देह विक्री करण्यास भाग पाडते. अशी ही दलालांची टोळी गरजू महिलांच्या शोधात फिरत असते.
ब्लॅकमेलिंग करून वेश्याव्यवसाय : इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया आल्यानंतर आता मानवी वाहतुकीनेही आपली पद्धत आधुनिक केलेली आहे. सोशल मीडियावर जाहिराती दिसू लागल्या आहेत. पार्टीच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी दिल्ली जवळील नोएडातील एक जाहिरात समाज माध्यमावर पाहायला मिळाली. त्यात सर्व काही ‘गोष्टींचा’ उल्लेख होता. त्याचे दर आणि ऑर्गनायझरचा संपर्क क्रमांक दिलेला होता. इतक्या उघडपणे हा प्रकार आता सुरू झालेला आहे. समाज माध्यमामुळे मुली आपल्या भावना अनोळखी व्यक्तींसमोर व्यक्तकरीत आहेत. त्यांना प्रेमात पाडून त्यांचे नग्नावस्थेतील व्हिडीओ काढले जात आहेत. त्याच्या आधारे ब्लॅकमेल करून ठिकठिकाणी त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. जादा पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवले जाते.