जळगाव : शहरातील मेहरून स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गायत्री नगर परिसरातील छबाबाई काशिनाथ पाटील (वय अंदाजे ७५) यांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. सोमवारी (दि.6) त्यांच्यावर मेहरून स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. मृत्यूपूर्वी त्यांच्या इच्छेनुसार अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यात आले नव्हते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी सोमवारी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थींमधील डोक्याचा, हाताचा आणि पायाचा भाग चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा
या संतापजनक घटनेनंतर पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा, अशी भावनिक मागणी केली आहे. आमदार सुरेश भोळे यांनीदेखील या घटनेचा निषेध नोंदवत, मृत नागरिकांच्या अस्थीही सुरक्षित नाहीत, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, असे वक्तव्य केले.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक नेमावा
या घटनेनंतर नागरिकांकडून स्मशानभूमीत तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून, चोरट्यांचा शोध घेणे ही पोलिसांसमोरील मोठी जबाबदारी ठरणार आहे.