सुनील कदम
आजकाल विज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही वेळात त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला आहे, ते स्पष्ट होते. पण, एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालावधीत असे कोणतेही तंत्रज्ञान विकसित झाले नव्हते. त्याचा नेमका गैरफायदा घेऊन गुन्हेगार हे प्रामुख्याने विषप्रयोग करून एखाद्याचा काटा काढायचे. एका सौंदर्यपरी विषकन्येने अशाच पद्धतीने इंग्लंडमधील लंडन शहरात मृत्यूचे तांडव मांडले होते. या विषकन्येच्या नरसंहाराची ही तितकीच भयचकित करणारी कहाणी...
जर्मनीमधील एका लहानशा शहरात अॅनाचे रूप हे खरोखरीच रूपगर्विता म्हणावे अशा तोडीचे होते. अॅनाचे वडील हे त्याठिकाणी एक खानावळ चालवत होते. त्यामुळे खाऊन-पिऊन बऱ्यापैकी सुखी, असे हे कुटुंब होते. पण, या सुखी कुटुंबाला कुणाचीतरी दृष्ट लागली आणि अॅनाच्या लहानपणीच तिचे आई-वडील निवर्तले.
अॅना उघड्यावर पडली. पण, तिच्या शेजारीच असलेल्या एका वकिलाने आपल्या स्वतःच्या मुलीची सवंगडी म्हणून तिचा सांभाळ केला आणि वयाच्या पंधराव्या वर्षी तिचे एका, तिच्यापेक्षा बऱ्याच थोराड वकिलाशी लग्न लावून दिले. अॅनाला हक्काचे घर तर मिळाले, तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली; पण जणूकाही सुखाने तिच्याशी उभा दावा मांडला होता. अॅनाचा हा वकील नवरा गडगंज श्रीमंत होता; पण तेवढाच अट्टल बेवडा होता. या दारूच्या व्यसनापायी त्याने आपल्याकडील धनदौलत तर उधळून टाकलीच, शिवाय तो कर्जबाजारीही झाला. घरदारही कर्जात गमावले. अखेर दारूच्या व्यसनातच एक दिवस हा वकील मेला आणि अॅना पुन्हा रस्त्यावर आली.
ऐन तारुण्यातील अॅना कुणाच्यातरी आधाराच्या शोधात होती आणि एका इसमाने तिला आसरा दिला; पण चार-सहा महिने अॅनाच्या सौंदर्याची आणि तारुण्याची मजा लुटल्यावर त्याने अॅनाला हाकलून लावले. पुन्हा आणखी एकाने अॅनाला आश्रय दिला; पण तिथेही तोच अनुभव आला. अॅनावर चोरीचा आळ घेऊन त्याने तिला घरातून हाकलून लावले.
अखेर अॅनावर नवऱ्याचे कर्ज फेडण्यासाठी आणि दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी पडेल तो उद्योग आणि प्रसंगी देहविक्रय करण्याची वेळ आली. याच दरम्यान तिची एका लष्करातील निवृत्त जनरलशी ओळख झाली आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आजन्म एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेऊन दोघे एकत्र राहू लागले. दरम्यान, या जनरलच्या आयुष्यात एक दुसरी स्त्री आली आणि जनरलने अॅनाला बाहेरचा रस्ता दाखविला.
अॅनाने बऱ्याच विनवण्या केल्या, किमान मोलकरीण म्हणून तरी मला ठेवून घ्या म्हणून हातापाया पडल्या; पण जनरल काही तयार झाला नाही आणि त्याने दोन मुलांसह अॅनाला हाकलून लावले. शेवटी पोटापाण्यासाठी म्हणून अॅनाने दोन मुलांसह इंग्लंडचा रस्ता धरला. १८०० साली ती इंग्लंडमध्ये आली आणि कधी हाऊसकीपर म्हणून तर कधी मोलकरीण म्हणून वेगवेगळ्या घरी कामे करू लागली. अॅना ही मुळातच नितांत सुंदर होती. त्यामुळे ती ज्या घरी काम करायची, तिथल्या मालकाचा तिच्यावर डोळा असायचा.
ही बाब मालकिणीच्या लक्षात आली की, ताबडतोब तिची हकालपट्टी व्हायची. कधी लेकरा-बाळांसाठी अॅना काम करीत असलेल्या घरात छोट्यामोठ्या चोऱ्याही करायची. दरम्यानच्या काळात अॅनाच्या मुलीचे इंग्लंडमधील एका मुलाशी लग्नही झाले होते. त्यामुळे तिचा बहुतेकदा मुक्काम हा आपल्या जावयाकडेच असायचा. एकदा असेच एका काम करणाऱ्या ठिकाणी अॅनाने एक छोटीशी चोरी केली आणि त्या घरमालकाने अॅनावर चोरीचा संशय घेऊन एका स्थानिक दैनिकात चक्क या चोरीची बातमीच छापून आणली.
अॅनाच्या जावयाने ही बातमी वाचताच त्याने ताबडतोब आपल्या सासूची म्हणजे अॅनाची आपल्या घरातून हकालपट्टी केली आणि अॅना पुन्हा एकदा रस्त्यावर आली. पण, आयुष्यात एका पाठोपाठ झालेल्या या आघातांनी अॅना इतकी उद्विग्न आणि संतप्त बनली की, तिने तमाम मानवजातीविरुद्ध जणूकाही युद्धच पुकारले आणि एका पाठोपाठ एकाला यमसदनी धाडण्याचा तिने सपाटाच लावला.
न्यायमूर्ती ग्लासर हे लंडनमधील एक बडे ग्रहस्थ होते. त्यांचा घटस्फोट झाला होता, त्यामुळे ते आपल्या बंगल्यात एकटेच राहात होते. आपल्या बंगल्याची देखभाल करण्यासाठी म्हणून ग्लासर यांनी अॅनाला कामाला ठेवले. याच दरम्यान त्यांच्या पत्नीमध्ये आणि त्यांच्यात समझोता होऊन ग्लासर यांची पत्नी २२ जुलै रोजी पुन्हा त्यांच्याकडे राहायला आली.
ग्लासर यांची पत्नी आली तेव्हा चांगली धडधाकट होती; पण लगेचच काही दिवसांनी तिला जुलाब, उलट्या, पोटदुखी, त्वचा कोरडी पडणे आणि तहानेने जीव कासावीस होणे असा त्रास सुरू झाला. ग्लासर यांनी सगळे उपाय करून पाहिले; मात्र काही उपयोग झाला नाही आणि २६ ऑगस्ट १८०९ रोजी तिचे निधन झाले. याप्रकरणी अॅनाचेच काहीतरी काळेबेरे असावे, अशी शंका आल्याने ग्लासर यांनी तिला कामावरून कमी केले. त्यानंतर ग्लासर यांच्या शेजारीच राहात असलेल्या न्यायमूर्ती ग्रहमन यांनी अॅनाला आपल्या घरी कामाला ठेवले. ते अविवाहित असल्याने एकटेच राहात होते. (पूर्वार्ध)