जळगाव : भुसावळ येथील नॉर्थ कॉलनीतील एका महिलेने जुगारात हरलेले पैसे भरून काढण्यासाठी घरफोडीचा बनाव रचल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या महिलेचा छडा लावून तिला अटक केली असून, दागिने बँकेत तारण ठेवून घेतलेले पैसे तिने जुगारात गमावल्याचे उघडकीस आले आहे.
आर.बी. २/९५८ A, नॉर्थ कॉलनी, लिम्पस क्लबजवळ मंगळवार (दि.१०) रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेच्या दरम्यान, या ठिकाणी घरफोडी झाल्याची तक्रार चेतन चंद्रमणी शिंदे यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले नसूनही घरफोडी झाल्याचा दावा यामध्ये करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळी तपासादरम्यान शेजारील घर १० दिवसांपासून बंद असल्याचे लक्षात आले आणि कोणत्याही प्रकारची जबर चोरी झाल्याचे पुरावे मिळाले नाहीत. संशय वाढल्यानंतर पोलिसांनी घरातील व्यक्तींची सखोल चौकशी केली असता शर्मीला चंद्रमणी शिंदे (वय ४९) यांनी ही खळबळजनक माहिती दिली.
जुगार खेळण्याची लागली होती सवय
त्यांनी काही दिवसांपासून जुगार खेळण्याची सवय लागल्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने भुसावळ येथील बुलढाणा अर्बन को-ऑप. बँकेत तारण ठेवले होते व त्यावर कर्ज घेतले होते. या रकमेचा उपयोग त्यांनी जुगार, आईच्या आजारपणासाठी तसेच घरखर्चासाठी केला होता. काही रोख रक्कमही जुगारासाठी वापरण्यात आली होती. नंतर जुगारात गमावलेले पैसे भरून काढण्यासाठी त्यांनी बनाव करून घरफोडीचा खोटा गुन्हा दाखल केला.
बँकेकडून त्या तारण दागिन्यांच्या पावत्या पोलिसांनी जप्त केल्या असून, शर्मीला शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, संदीप चव्हाण आणि महेश सोमवंशी यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली..