वणी (नाशिक) : वणी व परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून गुटख्याची तस्करी करणाऱ्या संशयितांना अखेर वणी पोलिसांनी अटक केली आहे. आलिशान वाहनातून गुटखा तस्करी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करून ११ लाख रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
वणी पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर, वणी-सापुतारा रस्त्यावर अंबानेर शिवारात पाळत ठेवण्यात आली. धनाई मातेच्या मंदिराजवळ एमएच ४६-झेड ४३९० क्रमांकाची महिंद्रा SUV या काळ्या काचा असलेल्या वाहनाची पोलिसांनी तपासणी केली असता, वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू व गुटखा सापडला.
वाहनात एकूण २० गोण्या आढळल्या असून प्रत्येक गोणीत २२ पाकिटे अशा ४४० 'विमल पानमसाला' पाकिटांची एकूण किंमत ८७,१२० रुपये इतकी होती. याशिवाय इतर सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांचे ९,६८० किंमतीचे साहित्य आणि १० लाख किंमतीचे वाहन असा एकूण ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी मजाजखान उर्फ मुज्जु रोशनखान पठाण (वय ४३, रा. भगवतीनगर, कसबे वणी) आणि शाहीद (पूर्ण नाव अपूर्ण) यांच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तस्करीसाठी गुजरात राज्यातून गुटखा आणला जात असून, अवघ्या ३५ किमी अंतरावर असलेल्या सीमेमुळे तस्करी सुलभ होते. यामागे आंतरराज्यीय तस्करांची साखळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत व पथकाने ही कारवाई पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे हे पुढील तपास करत आहेत.