धुळे : धुळे विश्रामगृहात आढळलेल्या १ कोटी ८५ लाख रुपयांच्या बेहिशोबी रकमेच्या प्रकरणात तपासात होत असलेल्या दिरंगाईवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तपास योग्य दिशेने झाला नाही, तर या प्रकरणातले इतर "स्फोट" उघड करावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात राऊत म्हणतात की, "राज्यातील भ्रष्टाचाराचा इतका सन्मानच करायचा असेल, तर अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ व त्यांच्या पी ए किशोर पाटील यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करा!"
२१ मे रोजी रात्री धुळे विश्रामगृहाच्या खोली क्रमांक १०२ मध्ये १.८५ कोटी रुपये सापडल्याची घटना समोर आली होती. ही रक्कम अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या पीएच्या खोलीत सापडल्याचा आरोप आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी उघड केलेल्या या प्रकरणात, अंदाज समितीच्या दौऱ्यानिमित्त ठेकेदारांकडून खंडणी स्वरूपात तब्बल १५ कोटी रुपये जमा केल्याचा आरोप आहे. त्यातील काही रक्कम आधीच बाहेर काढल्याचे बोलले जात आहे.
खासदार राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, “या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा झाली खरी, पण तिचा तपशील, सदस्य वा पुढील कारवाई अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे ही घोषणा निव्वळ जनतेची दिशाभूल करणारी आहे.”
"आपण वेळोवेळी एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही, तुरुंगात टाकू असे म्हणता. पण प्रत्यक्षात भाजप हा भ्रष्ट नेत्यांचा डम्पिंग ग्राऊंड झाला आहे. त्यांचे समर्थनही आपण करत आहात. त्यामुळे खरे फडणवीस कोणते – भ्रष्टाचाराविरोधात लढणारे की त्यांना पाठीशी घालणारे – हा प्रश्न निर्माण झाला आहे," असे राऊत यांनी म्हटले.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, "धुळे शहरातील व ग्रामीण भागातील रेशन दुकानदारांकडून प्रत्येकी १०,००० रुपये उकळून अंदाज समितीच्या अध्यक्षांना ‘नजराणा’ देण्यासाठी ही रक्कम गोळा करण्यात आली. हे केवळ तीन तासांत घडले. पुरवठा अधिकाऱ्यांनी तोंडी आदेश दिले. न दिल्यास रेड टाकण्याचा इशारा दिला गेला."
"आपल्या राज्यात भ्रष्टाचार विधिमंडळाच्या समित्यांपर्यंत पोहोचला आहे. आपण फक्त राजकीय मसलती व उद्योग-व्यवसायात गुंतले आहात. जर या प्रकरणाचा योग्य तपास झाला नाही, तर इतर स्फोट उघड करणे भाग पडेल," असा गंभीर इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.