सिन्नर ( नाशिक ) : ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील मनेगाव शिवारात अवैध गांजाची लागवड करण्यात आलेली झाडे उध्वस्त करण्यात आले. यात पोलिसांनी 24 झाडे उखडून सात किलो गांजा जप्त केला आहे. त्यांची किंमत सुमारे ७० हजार इतकी आहे.
पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कांतीलाल पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मनेगाव येथील येथील राजेश रामचंद्र जाधव याच्या राहते घराच्या मागील बाजूस परसबागेत अवैध गांजाची शेती केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून गांजाची झाडे उखडून जप्त केली. या प्रकरणी राजेश रामचंद्र जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्यासह नायब तहसीलदार सागर मुंदडा, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक गणेश वराडे, हवालदार मुकेश महिरे, रविराज गवंडी, साई नागरे, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.