Dhule Crime News
चंद्रावर पाऊल ठेवून काळ लोटला, आता माणूस मंगळाकडे झेपावला आहे; परंतु आपल्या देशात जात-पात, तसेच आर्थिक-सामाजिक दर्जा श्रेष्ठ ठरवत पोटच्या लेकरांचे बळी घेण्याचे सत्र सुरूच आहे. आपल्या लेकीने प्रेमविवाह केला, तोही अल्पशिक्षित तरुणांशी. त्याचा राग मनात बाळगून धुळे जिल्ह्यात एका पित्याने आपल्या लेकीस यमसदनास पाठवले. तर जावयावर गोळीबार करून त्यालाही उडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जावयाचा जीव वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धुळे : किरण मंगळे हे धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे रहिवाशी. ते केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असले तरी आपल्या मुलांनी शिकावे, स्वतःचे करियर घडवावे ही त्यांची इच्छा. ती प्रमाणभूत मानून त्यांची लाडकी कन्या तृप्ती हिने वैद्यकीय क्षेत्रात उच्चशिक्षण घेतले. किरण मंगळे यांच्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट. मुलगी उच्चशिक्षित झाली. आता तिचे लग्न करून देण्याची जबाबदारीही मंगळे यांची. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू झाली. मात्र, इथंच त्यांचं दुर्दैव आड आलं.
तृप्ती एका मुलाच्या प्रेमात पडलेली. अविनाश ईश्वर वाघ हे त्याचं नाव. तो त्यांच्याच जातीचा असला तरी तो काही तृप्तीसारखा उच्चशिक्षित नव्हता. तो पुणे येथे एका कंपनीत नोकरी करतो. ही गोष्ट किरण मंगळे यांना कळल्यानंतर ते संतापले. त्यांनी या लग्नास विरोध केला. खरे तर, अविनाशच्या प्रेमात पडलेल्या तृप्तीस यामध्ये काही गैर वाटत नव्हते. अविनाश तिच्यापेक्षा कमी शिकलेला असला तरी तो तिच्याच जातीचा व त्यांचा नातेवाईकच होता. त्यामुळे आपल्या लग्नाला तसा कुणाचा विरोध होणार नाही, असे तिला वाटत होते. पण, घडले ते भलतेच, मग मात्र तिनं वडिलांच्या विरोधाला न जुमानता अविनाशशी लग्न केले व गत दोन वर्षांपासून तो पुणे येथे स्थायिक झाली. तिचा प्रेमभरा संसारही सुरू झाला.पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते....
कन्येचा विवाह झाला तरी तो किरण मंगळे यांना रुचला नव्हता. तेव्हापासून ते अस्वस्थ होते. लग्नाला असलेला आपला कडवा विरोध ते बोलून दाखवत होते. अन् ते याच मानसिकतेत असतानाच २६ एप्रिल हा दिवस मंगळे-वाघ कुटुंबीयांच्या जीवनात काळी पहाट घेऊन आला. त्या दिवशी चोपडा येथे एका नातेवाईकाचा हळदीचा कार्यक्रम होता, तृप्तीनं प्रेमविवाह केला तरी नातेसंबंध तोडून जमणार नव्हते. साहजिकच तृप्ती आणि तिचे पती अविनाश ईश्वर वाघ हे या हळदीसाठी चोपडा येथे आले. त्यावेळी तृप्तीचे वडील किरण मंगळे हेही या कार्यक्रमाला आलेले. कार्यक्रम सुरू असतानाच तृप्ती समोर आल्यानंतर किरण यांनी त्यांच्याकडील बंदुकीतून तृप्तीवर गोळ्या झाडल्या. क्षणभरातच तृप्ती जमिनीवर कोसळली. आपल्या पत्नीवर झालेला गोळीबार पाहून अविनाश तिला वाचविण्यासाठी पुढे धावला असता किरण यांनी त्याच्यावरही गोळीबार केला. त्यामध्ये अविनाश गंभीर जखमी झाला.
अनपेक्षित घडलेल्या या भयंकर घटनेने सर्वांनाच धक्का बसला. मात्र काही क्षणातच सावरलेल्या हळदीच्या कार्यक्रमास आलेल्या नातलगांनी किरण मंगळे यांना पकडले व बेदम चोप दिला. त्यात किरण हे देखील गंभीर जखमी झाले. अविनाश व किरण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तृप्तीने मात्र जागेवरच प्राण सोडला. ऑनर किलिंगच्या या घटनेने जळगाव जिल्हा पुन्हा हादरला आहे. लग्नासारख्या पवित्र संस्कारास जात, धर्म, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दरी यांसारख्या कारणांचा विळखा पडला असून त्यापुढे निष्पाप जीवांचा नाहक बळी जात आहे.
तृप्तीसारखेच नाशिक येथे यापूर्वी घडलेले प्रमिला कांबळे हिचे प्रकरणही काळजाला पीळ पाडणारे आहे. प्रमिला गर्भवती होती. जून २०१३ मध्ये ती आपल्या वडिलांसोबत रिक्षातून निघालेली. तिच्या वडिलांनी रिक्षातच तिचा गळा आवळून खून केला. कारण काय तर... तिने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्याला जातपंचायतीचा विरोध होता व या विवाहामुळे प्रमिलाचे वडील एकनाथ कुंभारकर यांनाही आपली सामाजिक अप्रतिष्ठा झाली असे वाटत होते. जात पंचायतीच्या दबावाला बळी पडून सामाजिक प्रतिष्ठेचे अवडंबर माजवून आपल्या लाडक्या लेकीचा जीव घेणाऱ्या याच एकनाथ कुंभारकर यांना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.