Fake mobile tower scam | फेक मोबाईल टॉवर स्कॅम! 
क्राईम डायरी

Fake mobile tower scam | फेक मोबाईल टॉवर स्कॅम!

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे, कोल्हापूर

रेल्वे स्टेशनवरच्या गर्दीत आदित्य फोनवर बोलत उभा होता. मोबाईलवर फुल्ल नेटवर्क होते; पण अचानक दोन मेसेज धडकले, ‘तुमचे बँक खाते बंद झाले आहे आणि 10 हजारांचा संशयास्पद व्यवहार झाला, हे थांबविण्यासाठी तातडीने लिंकवर क्लिक करा.’ नुकतेच बँकिंग अ‍ॅप वापरून बाहेर पडलेल्या आदित्यचे डोके सुन्न झाले. ‘कुणीतरी खाते हॅक केल्याच्या’ भीतीने त्याने काहीही विचार न करता मेसेजमधल्या लिंकवर क्लिक केले, ओटीपी टाकला आणि पुढच्या दहा मिनिटांत खात्यातले 50,000 रुपये गायब झाले.

आदित्यला धक्का बसला; कारण त्याने कोणतीही फाईल डाऊनलोड केली नव्हती की कुणाशी आपला पासवर्ड शेअर केला नव्हता, तरीही हे झाले कसे? खरे तर, स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या एका कारमधून सायबर चोरट्यांनी फेक बेस स्टेशन म्हणजेच बनावट मोबाईल टॉवरचा सिग्नल सोडला होता. आपला मोबाईल नेहमी सर्वात शक्तिशाली सिग्नलकडे ओढला जातो, याच तांत्रिक गोष्टीचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी टाकलेल्या जाळ्यात आदित्यचा फोन नकळत त्यांच्या बनावट नेटवर्कला जोडला आणि अधिकृत वाटणारे फसव्या मेसेजचे जाळे विणले.

या सायबर क्राईम प्रकाराला फेक मोबाईल टॉवर स्कॅम किंवा फेक बेस स्टेशन सायबर फसवणूक, असे म्हटले जाते. यात सायबर चोरटे पोर्टेबल उपकरणांच्या मदतीने बनावट मोबाईल टॉवर उभारतात आणि जवळील मोबाईल फोनला आपोआप त्या खोट्या नेटवर्कशी जोडले जातात. या स्कॅमची कार्यपद्धती मोठी भयंकर आहे. गर्दीच्या ठिकाणी पोर्टेबल उपकरणाद्वारे बनावट सिग्नल सोडून आधी लोकांचे फोन हायजॅक केले जातात. एकदा का फोन खोट्या टॉवरशी जोडला गेला की, चोरटे थेट सिस्टीम मेसेज पाठवतात, जे अगदी बँकेसारखेच दिसतात. खाते ब्लॉक होईल किंवा पैसे चोरीला गेले अशा धमक्या देऊन यूजरला घाबरवले जाते. दबावाखाली आलेला माणूस घाईघाईत लिंकवर क्लिक करून आपली महत्त्वाची माहिती आणि ओटीपी या सायबर चोरट्यांच्या हाती सोपवतो.

या सापळ्यातून वाचायचे असेल तर काही धोक्याचे इशारे समजून घेणे गरजेचे आहे. जर तुमचा फोन अचानक 4-जी किंवा 5-जी वरून 2-जी वर आला, तर तो बनावट टॉवरचा संकेत असू शकतो. बँका कधीही मेसेजमध्ये लिंक पाठवून ओटीपी मागत नाहीत, हे कायम लक्षात ठेवा. संशयास्पद मेसेज आल्यास घाबरून न जाता अधिकृत अ‍ॅपवरूनच खात्री करा आणि फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा; कारण सायबर गुन्ह्यात पहिले दोन तास अत्यंत मोलाचे असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT