Escort scam | एस्कॉर्ट स्कॅम! 
क्राईम डायरी

Escort scam | एस्कॉर्ट स्कॅम!

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे, कोल्हापूर

एकटेपणा कधी कधी माणसाला अशा वाटेवर नेतो, जिथे पुढे सायबर सापळा उभा असतो. नोकरी करणारा आदित्य काही वर्षांपासून एकटाच राहत होता. काम, घर आणि शांत आयुष्य. पण, हळूहळू एकटेपणाचा कंटाळा येऊ लागला. अचानक एक दिवशी रात्री त्याला सोशल मीडियावर एस्कॉर्ट सर्व्हिस अशी पोस्ट दिसली. पोस्ट सोबत सुंदर मुलीचा फोटोदेखील होता.

त्या पोस्टमधील लिंकवर आदित्यने संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला एस्कॉर्ट सर्व्हिस पुरवणारा एजंट म्हणून ओळख करून दिली. व्हॉटस्अ‍ॅपवर काही आकर्षक मुलींचे फोटो पाठवले. फोटो पाहून आदित्यचा विश्वास बसला. एजंटने सांगितले, आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. आदित्यने सहा हजार रुपये पाठवले.

त्यानंतर खेळ सुरू झाला. तुमची बुकिंग कन्फर्म झाली आहे; पण हॉटेल एंट्री फी भरावी लागेल. महिलांसाठी इन्शुरन्स डिपॉझिट लागेल. पोलिस प्रोटेक्शन फी भरावी लागेल. एकामागोमाग एक कारणे सांगत पैसे मागितले जाऊ लागले. प्रत्येक वेळी आदित्यला सांगितले जाई, आता सगळे ठीक आहे, आजच भेट होईल. एजंट त्याला कधी एका हॉटेलमध्ये, कधी दुसर्‍या हॉटेलमध्ये जाण्यास सांगत राहिला. प्रत्येक ठिकाणी नवीन शुल्क, नवीन कारण! आदित्य दरवेळी पैसे भरत राहिला. कारण, प्रत्येक वेळी त्याला आश्वासन मिळत होते; पण भेट कधीच झाली नाही. सुमारे आठवडाभर हा खेळ सुरू राहिला. आदित्यला परिसरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पाठवले गेले. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नावाने शुल्क घेतले गेले. शेवटी त्याच्याकडून तीन लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळली गेली.

सध्या एस्कॉर्ट स्कॅमचे प्रमाण सोशल मीडियावर झपाट्याने वाढत आहे. आकर्षक मुलींचे फोटो, अव्हेलेबल इन कोल्हापूर अशा जाहिराती आणि कमी दर दाखवून फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा टेलिग्रामवर पोस्ट टाकल्या जातात. त्या पोस्टमधील नंबरवर संपर्क साधल्यानंतर वापरकर्त्याला टेलिग्राम किंवा व्हॉटस्अ‍ॅपवर नेले जाते आणि बुकिंग कन्फर्मेशन, रूम चार्ज, इन्शुरन्स, सिक्युरिटी फी अशा वेगवेगळ्या नावांनी आधी पैसे मागितले जातात. सुरुवातीला लहान रक्कम घेतली जाते; पण नंतर सतत नवीन कारणे देत अधिक पैसे उकळले जातात आणि प्रत्यक्षात ‘कोणतीही सेवा’ दिली जात नाही. या सायबर सापळ्यापासून वाचण्यासाठी अशा सोशल मीडिया पोस्ट किंवा टेलिग्राम लिंकवर विश्वास ठेवू नये, अनोळखी व्यक्तींना ऑनलाईन पैसे पाठवू नयेत. इंटरनेटवर आढळणार्‍या अशा सेवांपासून दूर राहणेच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. संशयास्पद व्यवहार झाल्यास त्वरित 1930 या सायबर गुन्हे हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा तक्रार नोंदवावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT