एरंडोल ( जळगाव ) : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवार (दि.17) रोजी सकाळी खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या अमानुष हत्येमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने तपास करून तिघा संशयितांना अटक केली आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मंगळवार (दि.17) रोजी दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको केला. आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी नागरिकांनी यावेळी केली. त्यामुळे महामार्गावर दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आंदोलक नागरिकांशी संवाद साधून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नागरिक आपल्या मागणीवर ठाम राहिले. रस्त्यांवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी संपूर्ण परिसरात तसेच पोलीस स्टेशनजवळ कडेकोट बंदोबस्त तैनात केला. सध्या एरंडोल पोलीस या खुनाचा तपास करत असून, निर्घृण हत्येच्या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.