प्रमोद म्हाडगुत, सिंधुदुर्ग
शनिवार 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडलेली 17 वर्षीय दीक्षा तिमाजी बागवे (रा. घावनळे- वायगंणवाडी) घरी परतलीच नाही आणि 58 दिवसांनी तिचे प्रेत वाडोस येथील शेत-मांगरात सापडले. कुडाळ तालुक्यातील या खुनाने संपूर्ण सिंधुदुर्ग हादरला असून या प्रकरणात पोलिसांनी दीक्षाच्या ओळखीचा मित्र कुणाल कृष्णा कुंभार (22, रा. गोठोस-मांडशेतवाडी) याला अटक केली आणि त्यांने गुन्हयाची कबुली सुद्धा दिली आहे.
दीक्षा सावंतवाडीतील विद्यालयात शिक्षण घेत होती. वडिलांचे निधन झाल्याने आई व आजी-आजोबांनीच तिचे संगोपन केले होते. कुणाल हा सावंतवाडी आयटीआयचा विद्यार्थी. दोघांची ओळख एसटी प्रवासात झाली, ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. मात्र दीक्षाने करिअरकडे लक्ष देण्यासाठी संबंध कमी करत ‘आपण फक्त मित्र राहू’, असे कुणालला सांगितले. हे कुणालला पटले नाही. ‘तू माझी नाही तर कुणाचीच होऊ देणार नाही’, असा कुणालचा पक्का इरादा होता. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.45 वा.च्या दरम्यान दीक्षा सावंतवाडी येथे विद्यालयात जाण्यासाठी आंबेरी येथे आली होती. यावेळी काहीतरी भूलथापा मारून कुणालने दीक्षाला मोटारसायकलवरून वाडोसच्या बाटमाचा चाळा परिसरात नेले. या ठिकाणी मुख्य रस्त्यांपासून आत जाणार्या कच्च्या रस्त्यावर नेऊन कुणालने दीक्षाचा दोरीने गळा आवळून खून केला.
खुनानंतर आरोपीने मृतदेह जवळच्या डॉ. शरद पाटील यांच्या शेतमांगरात लपवला. डॉ. पाटील यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी कुणाल मजुरीच्या कामाला जात होता, त्यामुळे त्याला वाडोस येथील मांगर व त्या निर्जनस्थळाची माहिती होती. दीक्षाचा मृतदेह सापडल्यानंतर तिच्या आई आणि बहिणीकडून ओळख पटवण्यात आली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि त्यांच्या टीमने आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे.
कुडाळ पोलिसांनी दोन दिवसांच्या शोधमोहीमेत आरोपीकडून 16 वस्तू हस्तगत केल्या. वाडोस येथील घटनास्थळी झुडपात लपवलेली सॅक मिळाली, ज्यात नायलॉन दोरी, दीक्षाचे दप्तर, मोबाईल, पास, सिमकार्ड, वही, हँडपर्स, छत्री, थम्ब रिंग, सॅनिटरी पॅडस् अशा वस्तू होत्या. हे सर्व पुरावे पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहेत.
कुडाळ न्यायालयाने आरोपी कुणाल कुंभार याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर अपहरण, खून व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आरोपीस कठोर शिक्षा होणे अटळ आहे, असे पोलिस निरीक्षक मगदूम यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी घटनास्थळी भेट दिली. घावनळे ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चा करत, पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपीस वकिलांकडून संरक्षण नको अशी मागणी केली.
कुडाळ पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुनाच्या आदल्या दिवशी कुणाल आणि दीक्षा यांच्यात 40 मिनिटांचा फोनवर संवाद झाला होता. घटनेच्या सकाळी 6 मिनिटांची शेवटची कॉल रेकॉर्डिंग आढळली आहे. खुनानंतर कुणाल गावात शांतपणे फिरत राहिला हे पाहून स्थानिक ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले.पोलिसांनी मेटल डिटेक्टर व बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने परिसराची झडती घेतली. दीक्षाची सोन्याची चेन अद्याप सापडलेली नाही, मात्र तिचा मोबाईल वाहत्या ओढ्यातून हस्तगत झाला आहे.